Walmik Karad : वाल्मिक कराडला तुरुंगातच पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, आता काय स्थिती?

Walmik Karad Panic Attack : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगातच पॅनिक अटॅक आला. त्याची प्रकृती बिघडली. तो सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. आता कशी आहे त्याची प्रकृती?

Walmik Karad : वाल्मिक कराडला तुरुंगातच पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, आता काय स्थिती?
वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 27, 2025 | 10:21 AM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. सीआयडीने त्याच्या विरोधात सबळ पुरावे दाखल केले आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून कारगृहात आहे. आपला याप्रकरणात काहीच संबंध नसल्याचा कांगावा करत त्याने न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. दरम्यान वाल्मिकला तुरुंगातच पॅनिक अटॅक आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. यापूर्वी सुद्धा प्रकृतीच्या कुरबुरीवरून त्याला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते. पण त्या ठिकाणी त्याची मोठी बडदास्त ठेवल्याचे दिसून आले होते. तर तुरुंगातही त्याच्या दिमतीला प्रशासनातील कर्मचारी आणि इतर लोकांना ठेवण्यात आल्याचे समोर आले होते.

कराडला पॅनिक अटॅक

वाल्मिक कराडला दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटू लागलं. त्याची प्रकृती अचानक बिघडली. कारागृहात गेल्यापासून कराडच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला पॅनिक अटॅक आल्याचे निदान करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले.

वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावले. त्यांनी कराडची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याचे समोर आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा रक्त नमुना अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे.

स्पेशल ट्रीटमेंट, वरिष्ठ अधिकारी निलंबित

कारागृहात वाल्मिकची खास बडदास्त ठेवल्याचे समोर आले होते. त्याचे प्रशासकीय यंत्रणेत चांगलेची ओळख असल्याचे या निमित्ताने उघड झाले. अनेक अधिकारी जणू त्याच्या दिमतीला लागले होते. याविषयीची तक्रार करण्यात आली होती. चौकशीअंती तुरुंगातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह एका महिला शिपायाला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्याची मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली आहे. याप्रकरणातील आरोपी कराड हा तुरुंगात गेल्यापासून त्याच्या प्रकृतीच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याची चर्चा होत आहे.