नुकताच ITI पूर्ण केला, ट्रेनी म्हणून रुजूही होणार होता, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं!

| Updated on: Oct 08, 2022 | 10:33 AM

20 वर्षांच्या प्रणयच्या वडिलांचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला, संघर्ष करत आयटीआय शिक्षण पूर्ण केलं, ट्रेनी म्हणून तो रूजू होणार त्याआधी अघटीत घडलं.

नुकताच ITI पूर्ण केला, ट्रेनी म्हणून रुजूही होणार होता, पण नियतीच्या मनात वेगळंच होतं!
तरुणाचा दुर्दैवी अंत
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

तेजस मोहतुरे, TV9 मराठी, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसरमध्ये 20 वर्षीय तरुणाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू (Bhandara Drown Death) झाला. प्रणय शिवराम पराते, (Pranay Shivram Parate) असं मृत्यू झालेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मूळचा गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील असून तिरोडा तालुक्यातील सरांडी येथे राहायला होता. आपल्या नातलगांच्या रक्षा विसर्जनासाठी तो आला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.

प्रणयचे नातलग असलेल्या नरेंद्र पराते यांच्या निधनानंतर सरांडी येथून कुटुंबीय आणि नातेवाईक भंडारा जिल्ह्यातील देव्हाडा येथे आले होते. रक्षा विसर्जनासाठी ते सगळे वैनगंगा नदी घाटावर दाखल झाले. यावेळी अंघोळ करण्यासाठी प्रणय नदीपात्रात उतरला. पण पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडू लागला.

प्रणय बुडत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याचे मित्र संस्कृत सोरते (17), वेतन संजय सोरते (18, रा. देवरी चिचगड), सुनील पराते (35, रा. देवरी) प्रणयला वाचवण्यासाठी धावून गेले. पण तेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

हे सुद्धा वाचा

अखेर चौघांनाही वाचवण्यासाठी सोबत असलेली इतर मंडळीही गेली. यावेळी तिघांना वाचवण्यात यश आलं. पण प्रणय पाण्यात बुडून दिसेनासा झाला.

या घटनेची माहिती मिळताच माडगीचे सरपंच तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेची माहिती करडी पोलिसांना आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. दोन्ही विभागांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रणयचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर प्रणयचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. प्रणयच्या मृत्यूने रक्षा विसर्जनासाठी आलेल्या सगळ्यांनाच मोठा हादरा बसला.

वैनगंगा नदीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या प्रणयच्या वडिलांचा 5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. प्रणयची आई आशा वर्कर असून, त्या 4 मुलांचा सांभाळ करत होत्या. तरुण मुलाच्या मृत्यूने त्यांच्यावर मनावर मोठा आघात झालाय.

प्रणयने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले होते. लवकरच ट्रेनी म्हणून रुजू होणार होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. प्रणयच्या मृत्यूने परते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रणयच्या पश्चात आई, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.