देशाचा राजा कायम राहणार, पण…; भेंडवळच्या भविष्यवाणीने राजकारणात खळबळ, सत्तेबाबत वर्तवलं मोठं भाकीत
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील ३७० वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध घटमांडणीचे यंदाचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. देशाचा राजा स्थिर राहील पण प्रचंड तणावात असेल, तसेच सीमा सुरक्षा आणि आर्थिक मंदीबाबत कोणते संकेत देण्यात आले आहेत.

गेल्या ३७० वर्षांपासून सुरु असलेली परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणीचे निष्कर्ष अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आले आहेत. यंदा भेंडवळाच्या भाकितात राजकीय आणि सामाजिक स्थितीवरही भाष्य करण्यात आले. यावर्षी देशाचा राजा कायम राहील, मात्र तो प्रचंड तणावात असेल, असे भाकित वर्तवणयात आले आहे. त्यासोबतच देशाच्या सीमांवरील संरक्षण व्यवस्था कमकुवत होईल, असे मोठे संकेत या मांडणीतून देण्यात आले आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या भेंडवळाच्या घटमांडणीचा निकाल ऐकण्यासाठी खानदेश, मराठवाडा आणि लगतच्या मध्य प्रदेशातून हजारो शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे गर्दी केली होती. सारंगधर महाराज यांनी नुकतंच हे भाकित जाहीर केले. या निष्कर्षांनी यंदा देशाच्या राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रावर मोठ्या उलथापालथीचे संकेत दिले आहेत.
सत्तेत कोणताही मोठा बदल नाही
भेंडवळच्या घटमांडणीत राजाचा प्रतिकात्मक अर्थ देशाचे सर्वोच्च नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान असा घेतला जातो. यावर्षीच्या मांडणीत देशाचे सध्याचे नेतृत्व स्थिर राहील. सत्तेत कोणताही मोठा बदल होणार नाही. सत्तेला तातडीचा कोणताही धोका नसल्याचे असे संकेत वर्तवण्यात आले आहेत. सत्ता कायम असली तरी कारभार करताना राजाला पावलोपावली आव्हानांचा सामना करावा लागेल. राजकीय विरोध, मित्रपक्षांची नाराजी किंवा आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे पंतप्रधानांवर प्रचंड मानसिक ताण असेल.
संरक्षण खात्यावर प्रचंड ताण
मात्र यंदा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजवणारे भाकित वर्तवण्यात आले आहे. देशाच्या संरक्षण खात्यावर प्रचंड ताण येईल. सीमावर्ती भागात परिस्थिती संवेदनशील राहून शत्रू राष्ट्रांकडून कुरघोडी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे देशाची संरक्षण स्थिती काहीशी कमकुवत भासणार असल्याचे भाकितात म्हटले आहे. यामुळे देशाला सुरक्षिततेच्या बाबतीत अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे.
तसेच सर्वसामान्यांसाठी आर्थिक आघाडीवर काहीसे नकारात्मक संकेत दिसत आहेत. देशात आर्थिक मजबुतीचा अभाव दिसेल. देशाची आर्थिक परिस्थिती यंदा फारशी मजबूत राहणार नाही. बाजारपेठेत मंदीचे वातावरण राहू शकते, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशी झाली घटमांडणी
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी ही घटमांडणी केली होती. १८ धान्यांची मांडणी करून, त्यातील बदलांवरून वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते. हे निष्कर्ष ऐकण्यासाठी महाराष्ट्र, खानदेश आणि मध्य प्रदेशातून हजारो शेतकऱ्यांनी भेंडवळ येथे गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.