Ashok Kharat Case : जमीन मलाच विका, नाहीतर… भोंदू खरातने धमकावून बळकावली ईशानेश्वर मंदिराची जागा ?

पोलीस कोठडीतील भोंदू अशोक खरातवरील जमीन फसवणुकीचा नवा गुन्हा उघड झाला आहे. माळी बंधूंनी आरोप केला आहे की, खरातने त्यांना धमकावून त्यांची जागा फार्म हाऊस व मंदिरासाठी बळकावली. त्यांनी खरातच्या दबावामुळे आधी तक्रार केली नाही, पण आता न्याय आणि त्यांची जमीन परत मिळावी अशी मागणी करत आहेत.

Ashok Kharat Case : जमीन मलाच विका, नाहीतर... भोंदू खरातने धमकावून बळकावली ईशानेश्वर मंदिराची जागा ?
माळी बंधूंची खरताने केली फसवणूक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 2:17 PM

भोंदू अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या असंख्य कारनाम्यांची मोठमोठी माहिती, फसवणूनक तसेच शोषण केल्याचे अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहेत. आता याच खरातचा आणखी एक गुन्हा, कारनामा समोर आला आहे. जागेसंदर्भात आमची फसवणूक झाली असा आरोप मूळ मालक माळी बंधू यांनी केला आहे. ईशान्येवर मंदिर, फार्म हाऊसला जागा दिलेल्या मूळ मालकांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला असून आमची जागा आम्हाला परत द्या, अशी मागणी केली आहे.

ईशान्येवर मंदिर असेल किंवा भोंदू खरातचं फार्म हाऊस असेल, ते ज्या जागेवर उभारण्यात आलं, त्या जागेचे मूळ मालक चारही माळी बंधू टीव्ही9 मराठीशी बोलत होते. त्यांनी खरंतर सल्ला घेण्यासाठी अशोक खरात याला त्या जागेवर नेलं होतं, मात्र तिथे गेल्यानंतर अशोक खरातने त्यांचीच फसवणूक केली. मला तुम्ही जागा विका, नाहीतर तुमच्यापैकी दोन भाऊ मयत होतील, असं खरातने सांगितल्याचा धक्कादायक खुलासा माळी बंधूंनी केला आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

सदर जमीन मी खूप वर्षांपूर्वी विकत घेती होती. त्यानंतर मी स्वत: 8 वर्ष शेती करत होतो, पण त्यातून पाहिजे तसं उत्पन्न काही निघेना म्हणून आम्ही चांगला बाबा बघून त्याच्याकडे सल्ला विचारण्याचा निर्णय घेतला. आमच्या जागेत उत्पन्न का येत नाही हे विचारण्यासाठी आम्ही चौघे भाऊ अशोक खरात यांच्याकडे गेलो, मात्र सल्ला देण्याच्या नावाने अशोक खरातने आम्हाला चुनाव लावला, असा आरोप माळी बंधूमपैकी एकाने केला. तुम्हाला ही जमीन शक्यतो लाभणार नाही, तुमच्या घरात धोका होऊ शकतो, किंवा 1-2 जणांचा मृत्यूही होऊ शकतो, असं खरातने आम्हाला सांगितलं.

खरातने असं सांगितल्यावर आम्ही चौघांनी बसून निर्णय घेतला. आम्हाला अपेक्षा होती की त्यांनी दुसरं गिऱ्हाईक आम्हाला पाहून द्याव, म्हणजे हा व्यवहार करता आला असता, परंतु कालांतराने त्यांनी ती जागा स्वत:च विकत घेतली, पण आम्हाला योग्य त्या पद्धतीने रक्कम दिली नाही, त्याच्यातही फसवणूक झाली आमची, असा आरोप दुसऱ्या भावाने केला.

पैसे बुडवल्यावर तक्रार का केली नाही ?

त्याने आमचे पैसे दिले नाहीत, रक्कम बुडवली, पण आम्ही तेव्हा कुठेच तक्रार केली नाही, कारण आमच्या समस्येमुळे आम्हीच एवढे पिडलेले होतो, की नाजूक परिस्थितीमुळे आम्हाला आमचचं जीवन जगणं दुरापास्त झालं होतं. त्या प्रसंगामुळे, त्या दबावापोटी आम्हाला काही करता आलं नाही. तसंच खरात ही अशी व्यक्ती होती, की सर्वसामान्य लोकांच्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर, सन्मान होता, अशा व्यक्तीबद्दल आपण कसं काय, काही बोलणार, उद्या लोकं आपल्यालाच विरोध करतील, असं आम्हाला वाटलं, असं तिसऱ्या भावाने सांगितलं. फसवणूक झाल्यानंतर भीती पोटी तक्रार करणे टाळले, त्यामुळेच आम्हाला काहीही करता आलं नाही. पण आता याप्रकरणात लक्ष घालून आम्हाला आमची जमीन परत द्यावी अशी मागणी आहे, असं ते म्हणाले.

आम्ही चारही भाऊ भूमीहीन

आता,  आम्ही चारही भाऊ भूमीहीन झालो आहोत. शासनाने आम्हाला आमची जमीन परत करावी, आम्हाला न्याय मिळवून द्यावा असं आमचं शासनाकडे मागण आहे. ती जमीन विकल्यापासून आमची प्रगति होण्याऐवजी अधोगती झाली. चौघेही आम्ही भूमीहीन आहोत, शेती नाही , काहीच नाही आमच्या नावरवरती, त्यामुळे आम्हाला आमची जमीन परत मिळावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे, असा पुनरुच्चार चौथ्या भावाने केला.

Follow Us