
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची धामधूम सुरू आहे. आगामी काळात जिल्हा परिषदा आणि महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आपापल्या सोयीनुसार अनेक नेते पक्षांतर करतानाही दिसत आहेत. अशातच आता बीडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी हाताची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला आहे. तसेच धाराशिवमधील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यात कोणत्या नेत्यांचा समावेश आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच नागपुरमध्ये शिवसेनेचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्ह्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, बीड विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश डरफे, किशोर ढाकणे, नागनाथ शिंगण यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ खताते यांची याप्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली.
याच कार्यक्रमात उबाठा गटाचे धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आणि धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्हा बँकेचे संचालक डॉ.संजय कांबळे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष मालोजी पाटील, रमेश भालेकर, हनुमंत जाधव, अरुण मुंढे व असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. तसेच शिवसेना विधी संघटना विदर्भ प्रदेश ऍड.विनीतकुमार रूडे, ऍड.महेश राठोड, ऍड.बुरानुल शेख आणि त्यांच्यासह 45 वकिलांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
📍 नागपूर |#बीड जिल्ह्याचे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल टेकाळे, बीड विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश डरफे, किशोर ढाकणे, नागनाथ शिंगण यांनी काल शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या… pic.twitter.com/jAGhGpp6iz
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 11, 2025
यावेळी शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, ऍड.ध्वनील गलधर तसेच बीड, धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यामुळे बीड, धाराशिवसह विदर्भातही शिवसेनेची ताकद वाढली आहे. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदेंना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गट आणि काँग्रेसची अडचण वाढण्याची शक्यता आहे.