गोमांस खाणारा मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात कसा? हिंमत असेल तर राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला घेरलं
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारमधील एक मंत्री गोमांस खातो असं म्हणत त्याचा राजीनामा मागितला आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचे नेते अनेकदा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व सोडल्याची टीका करत असतात. उद्धव ठाकरेंनी भगवा झेंडा सोडून दुसरा झेंडा हाती घेतला आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंवर केला जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी या सर्व टीकेवरून विरोधकांनी उत्तर दिले आहे. तसेच भाजपचा एक मंत्री गोमांस खातो असं म्हणत अमित शाह त्यांच्या शेजारी बसून जेवण करतात असंही ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजपने आणि संघाने मला हिंदुत्व शिकवू नये – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे हिंदुत्वावर बोलताना म्हणाले की, ‘अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहे. त्यांचा एक फोटो कुणीतरी ट्वीट केला आहे. मला अमित शाह यांनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. भाजपनेही नाही आणि संघाने तर अजिबात नाही. तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. मी गोमांस खातो. कोण मला आडवतो बघतो असं ते म्हणतात. एक फोटो आहे, 9 डिसेंबरचा. ते मंत्री आहेत. त्यांचं नाव किरण रिजिजू. त्यांच्यासोबत शाह जेवत आहे. त्यांच्या आणि यांच्या थाळीत काय असेल माहीत नाही. अमित शाह यांना माझ्या हिंदुत्वावर शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजीजू यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण ते गोमांस खातात त्यांनीच सांगितलं.’
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘अमित शाह यांनी मला हिंदुत्व शिकवू नये. त्यांच्या आणखी काही गोष्टी बाहेर येतील. जीनांच्या थडग्यावर कोणी माथा टेकवला इथपासून ते बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. नवाज शरीफांचा केक कोणी खाल्ला होता इथपासून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. अगदी देशाबरोबर अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबरोबर यांचा मुलगा क्रिकेट खेळतोय तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जातं?’
शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पॅकेजचं काय झालं?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ठाकरे म्हणाले की ‘हे विदर्भासाठी आणि महाराष्ट्रासाठी अधिवेशन घेतलं जातं. सोमवारपासून अधिवेशन सुरू झालं. अधिवेशन मध्यावर आलं. विदर्भासाठी काय दिलं हा प्रश्न उपस्थित केलं गेलं पाहिजे. हे वर्ष विचित्र गेलं. राज्यावर अतिवृष्टीची मोठी आपत्ती कोसळली. मी स्वत: फिरलो. विदर्भातील आमदार आणि शिवसैनिक फिरले. शेतकर्यांची घरे दारे, विद्यार्थ्यांची पुस्तके आणि पीकेही सडली. शेतजमीनही वाहून गेली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पॅकेज नावाने एक गोंडस शब्द देऊन काही रक्कम दिली. त्या पॅकेजचं काय झालं? त्याचंही ठिबक सिंचन झालं का? हे कळायला मार्ग नाही.’
