
गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे भूम-परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
अजित पवार यांनी राहुल मोटे यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार म्हणाले की, ‘सत्तेच्या विरोधात जाऊन विकासकामे होत नसतात तर सत्तेत राहून जनतेची कामे होत असतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. त्यादृष्टीने कामाला लागा. भेदभाव न करता आपल्या पक्षाला कसे यश मिळेल याकडे लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे पक्षाला फटका बसू शकतो.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी आपल्याला बेरजेचे राजकारण शिकवले आणि ते आपण करतोय. जातीभेद, धर्म, पंथ न बाळगता एकत्र नांदण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे जातीय सलोखा राखण्याची जबाबदारी आपली असली पाहिजे. लोकांचे प्रश्न त्यांच्यात मिसळून सोडवले गेले पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
पक्षाच्या वाढीसाठी नवीन कार्यकर्त्यांची उभारणी करायची आहे. त्यासाठी वडीलधाऱ्या लोकांचा आशिर्वाद घ्यायचा आहे. त्यांच्या सहकार्यानेच पक्षाची बांधणी करायची आहे. पक्षाची स्थापना अशाच ज्येष्ठ लोकांच्या आशिर्वादाने झाली आणि आज पक्ष 26 वर्षाचा झाला आहे. आपण चुकीचे वक्तव्य करतो आणि मग ते सर्व माध्यमातून दाखवले जाते. सोशल माध्यमांची सध्या ताकद वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी भान ठेवून वागले पाहिजे, बोलले पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
आजच्या कार्यक्रमाला, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, काशिनाथ दाते, सतीश चव्हाण, विक्रम काळे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, धाराशीवचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूज्जमा, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.