शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून मोठी बातमी, घडामोडींना वेग

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र आता दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला मोठा धक्का, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून मोठी बातमी, घडामोडींना वेग
एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 4:17 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, येत्या 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. दरम्यान या निवडणुकीनंतर राज्यात लगेचच  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यानंतर राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, दरम्यान या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरला वेग आला आहे, अनेक इच्छुक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मात्र भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगचा सर्वात जास्त फटका हा विरोधकांना बसण्याऐवजी शिवसेना शिंदे गटालाच बसल्याचं पहायला मिळत आहे.

यावरून अनेकदा शिवसेना शिंदे गटाकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं होतं, तर दुसरीकडे वाढत्या पक्षांतरामुळे नाराज असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी तर थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार घातला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे, मात्र शिवसेना शिंदे गटातून नाराजीचा सूर असताना देखील भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

मात्र आता मोठा उलटफेर पहायला मिळत आहे, तो म्हणजे यावेळी भाजपने नाही तर शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे.  अंबरनाथमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ.रोझलिन फर्नाडिस यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अरविंद वाळेकर यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला, तुम्ही जर आमचे कार्यकर्ते फोडले तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही यावेळी भाजपला शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.