
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. धनंजय पिसाळ हे मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे गटनेते देखील होते. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. मात्र ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश केल्यानं हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. धनंजय पिसाळ यांचा वार्ड हा युतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गेल्यामुळे ते पक्षावर नाराज झालं, त्यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षाचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका मनीषा राहाटे या देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत युती केली आहे, त्यामुळे अनेक इच्छुकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी युती
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानं मनसे आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 25 जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाला या निवडणुकीत 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.