
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आधी नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका झाल्या, आणि आता राज्यता निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात जेव्हा नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली होती, तेव्हा भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झाल्याचं पहायला मिळालं, शिवसेना ठाकरे गटाला देखील अनेक धक्के बसले, शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा देखील हे चित्र फारसं बदललं नाही, महापालिका निवडणुकांमध्ये देखील अनेक जणांनी शिवसेना ठाकरे गट सोडला, काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काही जणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
निवडणुकींच्या तोंडावर होणारे पक्षप्रवेश आता शिवसेना ठाकरे गटासाठी डेकेदुखीचा विषय ठरला आहे, असे पक्षप्रवेश रोखणे हे शिवसेना ठाकरे गटासमोर मोठं आव्हान आहे. दरम्यान आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, येत्या पाच फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर सात तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार आहे.
लातूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. औसा तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकरराव माने हे उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांची औसा तालुक्यात ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिनकरराव माने यांनी 204 मध्ये अभिमन्यू पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.