
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या तब्बल 232 जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं आलं.
मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं चित्र आहे. एकामागून एक नेते आणि पदाधिकारी महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.
दरम्यान आता आणखी एक मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसणार आहे. गुहागरमधील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या नेत्रा ठाकूर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरेंसोबतच भास्कर जाधव यांना देखील मोठा धक्का मानला जात आहे. ठाकूर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
कदम यांची प्रतिक्रिया
दरम्यान या पक्षप्रवेशावरून रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव यांची आज झोप उडून जाणार आहे, गुहागरमध्ये मोठा पक्ष प्रवेश आहे. मीच माझी पाठ थोपटून घेतली पाहिजे, मातोश्रीची निष्ठा आम्हाला काय शिकवता,काँगेससोबत गेलात आणि आम्हाला निष्टा शिकवता. माजी आमदार संजय कदम पुन्हा आपल्या कुटुंबतबात आले, संजय कदम यांच्या बाबतीत महामंडळाचा एखादा निर्णय व्हावा, अशी विनंतीही यावेळी कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी घरी बसायचा निर्णय घेतला होता, पण शिंदे साहेबानी मला पुन्हा कामाला लावलं. वय झालं असलं तरी आता थांबणार नाही, कोण तो अनिल परब, त्यांच्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. 35 ची नोटीस दिल्याशिवाय आरोप करता येत नाहीत, मग हे कसं काय झालं, हे काय मॅनेज झालं का ? असा सवालही यावेळी कदम यांनी उपस्थित केला.