महाराष्ट्रात मोठं अस्मानी संकट, फडणवीसांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींनी काय दिलं आश्वासन?

राज्यावर मोठं अस्मानी संकट कोसळलं आहे, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती दिली.

महाराष्ट्रात मोठं अस्मानी संकट, फडणवीसांचा दिल्ली दौरा, पंतप्रधान मोदींनी काय दिलं आश्वासन?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2025 | 3:50 PM

राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस झाला त्याचा चांगलाच तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं बळीराजा हातबल झाला आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे हे शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पावसामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीची कल्पना दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत गृहमंत्र्यांना देखील निवेदन दिलं होतं, त्यानंतर त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रावर पावसामुळे मोठं संकट कोसळलं आहे, राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.  दिवाळीपूर्वी सरकारला शेतकऱ्यांना भरीव मदत द्यायची आहे. त्यासाठी एनडीआरएफचे जे निकष आहेत, त्या व्यतिरिक्त देखील केंद्राकडून मोठ्या प्रमाणात  मदत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

फडणवीस यांनी काय म्हटलं? 

दरम्यान मोदींसोबतची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी एक निवेदन दिलं आहे, माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीचं निवेदन मी मोदी यांना दिलं. त्यांना मी महाराष्ट्रातील सध्याच्या पूरस्थितीची कल्पना दिली. पंतप्रधानांनी मदतीचं आश्वास दिलं आहे, त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या, तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करू, असं आश्वासन मोदी यांनी दिलं आहे, असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्राचं पथक देखील पावसामुळे महाराष्ट्रात झालेल्या नुकसानाची पहाणी करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी प्रती हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करा अशी मागणी विरोधकांनी राज्य सरकारकडे केली आहे.