नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी बातमी; सीबीआयचं पथक पुन्हा नांदेडमध्ये, दोन ठिकाणी छापे
नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सीबीआयचं पथक पुन्हा एकदा नांदेडमध्ये दाखल झालं आहे. सीबीआयकडून नांदेडमध्ये तीन ठिकाणी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सीबीआयचं पथक पुन्हा एकदा नांदेडमध्ये दाखल झालं आहे. सीबीआयकडून नांदेडमध्ये तीन ठिकाणी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात दोन विद्यार्थी आणि एका कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर सीबीआयचं पथक नांदेडहून पुन्हा लातूरकडे रवाना झालं आहे.
वैद्यकीय परीक्षेसाठी नीट ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. मात्र या परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं देशभरात मोठा गोंधळ उडाला होता. नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं समोर येताच सरकारने ही परीक्षा रद्द केली आणि या प्रकरणाच्या तापासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयकडून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काही जणांचा समावेश आहे.
दरम्यान आज पुन्हा एकदा सीबीआयचं पथक नांदेडमध्ये आलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी सीबीआयकडून तीन ठिकाणी चौकशी करण्यात आली. शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकत सीबीआने तपास केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात सीबीआयने दोन विद्यार्थिंनीची आणि एका कुटुंबाची चौकशी केली आहे. यापूर्वी चौकशी केलेल्या एका विद्यार्थिनीची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे. सुमारे सात ते आठ तास ही चौकशी सुरू होती, त्यानंतर सीबीआयचं पथक पुन्हा लातूरकरडे रवाना झालं. पेपरफुटी प्रकरणाचा तपासा सुरू असताना समोर आलेल्या माहितीच्या आधारे, पेपर विकत घेतल्याच्या संशयावरू ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान पुन्हा नीट परीक्षा पेपर लीक सारखी घटना घडू नये, यासाठी आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय लष्कराकडे सोपवण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर शिक्षण वर्तुळातून समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.