
केलेल्या कामाच्या बिलाचे पैसे न मिळाल्यानं कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सरकारकडून बिल निघत नसल्यानं ते आर्थिक अडचणीत सापडले होते, आणि त्यातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं अशी माहिती समोर आली आहे, या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे, मात्र आता या घटनेबाबत नवी माहिती समोर आली आहे, याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांनी माहिती दिली.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आज सकाळी दहा वाजता एक बैठक झाली, या बैठकीला चीफ सेक्रेटरी उपस्थित होते. आम्ही सगळे जण उपस्थित होतो. प्लॅनिंग, फायनान्स सर्वच विभागातले प्रमुख अधिकारी उपस्थित होते, आता मी सर्वांचे नाव घेत नाही. त्यावेळेसच मी सर्व माहिती घेतली. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हे कंत्राट एका दुसऱ्या कंत्राटदाराला दिलं होतं, त्याने सब कॉन्ट्रॅक्टर नेमला आहे. आमचा संबंध येते तो मुख्य कॉन्ट्रॅक्टरशी, उद्या तुम्ही कंत्राटदार म्हणून काम घेतलं आणि आम्ही तुम्हाला काम दिलं. तुमचे बिल येतील तसे आम्ही पैसे देऊ, समजा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सब कंत्राटदार नेमलं असेल, तर सब कंत्राटदाराला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये, अधिकार तुमचा आहे.
आता तुमचं आणि त्यांचं काय झालं? त्याची आम्हाला माहिती नाहीये, बऱ्याचवेळेला काय होत, की तुम्ही लगेचच ब्रेकिंग न्यूज सुरू करता. तो तुमचा अधिकार आहे, मात्र दुसरी बाजू देखील मीडियानं दाखवली पाहिजे, मी तिथे विचारलं जीवन प्राधिकरणामध्ये कोण कंत्राटदार आहे? जल जीवन ही जी योजना आहे, ती केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेत 50 टक्के निधी हा केंद्राचा तर 50 टक्के निधी हा राज्याचा असतो. त्यांचा निधी येईल तसे आपण तिथे अधिकचे पैसे देतो, कधी आपल्या निधीमधून देखील देतो. त्यामुळे आम्ही त्यांना काय थेट कंत्राट दिलेलं नव्हतं, तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं, किंवा त्याने स्वत: आत्महत्या करणं, यामागे नेमकी काय कारणं आहेत? याचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.