Satara doctor death : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठं ट्विस्ट, तो धष्टपुष्ट व्यक्ती कोण? वडिलांच्या दाव्यानं खळबळ

फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवलं, या घटनेनं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पीएसआय गोपाळ बदने विरोधात गंभीर आरोप केले आहेत, या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

Satara doctor death : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात मोठं ट्विस्ट, तो धष्टपुष्ट व्यक्ती कोण? वडिलांच्या दाव्यानं खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 6:26 PM

सातारा जिल्ह्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली आहे, एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं असून, खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत्यूपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिल्याचं देखील आढळून आलं आहे, ज्यामध्ये त्यांनी पीएसआय गोपाळ बदने याच्यावर गंभीर आरोप केले आहेत, पीएसआय बदने याने माझ्यावर अत्याचार केल्याचा आरोप या डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. तसेच तिने प्रशांत बनकर याच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत, प्रशांत बनकर आपला मानसिक आणि शारीरीक छळ करत होता असं या तरुणीने म्हटलं आहे.

दरम्यान आता आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे. पीडितेच्या वडिलांनी खळबळजनक दावा केला आहे. मी माझ्या मुलीला  भेटायला गेलो होतो, त्यावेळी एक अनोळखी असलेला धष्टपुष्ट माणूस मला भेटला होता. तुम्ही मॅडमचे वडील का? काही लागलं तर मला सांगा, असे मला त्याने विचारले होते. तेवढ्यात माझ्या मुलीने बघितलं. माझ्या हाताला धरून बाजूला घेतलं, आणि कोणालाही असं बोलत जाऊ नका असं मुलीने मला सांगितलं होतं, असा धक्कादायक खुलासा या प्रकरणात या महिला डॉक्टरच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे आता पीडितेच्या वडिलांना भेटणारा आणि काही लागलं तर सांगा म्हणणारा तो धष्टपुष्ट व्यक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात आरोपी असलेल्या प्रशांत बनकर याच्या बहिणीने देखील धक्कादायक दावा केला आहे. मृत महिला डॉक्टर साधारणपणे एक वर्षांपासून आमच्याकडे राहात होती. मी एक -दोन महिने आमच्या घरी राहण्यासाठी आले होते, तेव्हा आमच्यात चांगली मैत्री देखील झाली होती,  महिला डॉक्टर यांनी माझा भाऊ प्रशांत बनकर याला प्रपोज देखील केलं होतं, असा दावा प्रशांतच्या बहिणीने केला आहे.