बारामतीच्या लेकीलाच भाजपची उमेदवारी, कांचन कुल आणि पवार कुटुंबाचं नातं काय?

बारामती : अलिकडील काळात नात्यागोत्यांचं राजकारण आणि राजकारणातील नातीगोती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. जवळच्या नात्यातील, पण वेगवेगळ्या पक्षात अशी उदाहरणेही आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पवार कुटुंबीयांच्या जवळच्या नात्यातील आहेत, इतकंच काय तर …

kanchan kul, बारामतीच्या लेकीलाच भाजपची उमेदवारी, कांचन कुल आणि पवार कुटुंबाचं नातं काय?

बारामती : अलिकडील काळात नात्यागोत्यांचं राजकारण आणि राजकारणातील नातीगोती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. जवळच्या नात्यातील, पण वेगवेगळ्या पक्षात अशी उदाहरणेही आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पवार कुटुंबीयांच्या जवळच्या नात्यातील आहेत, इतकंच काय तर त्या बारामती तालुक्यातल्या आहेत. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पुढाकाराने कांचन या कुल घराण्याच्या सून बनल्यात. त्यामुळे नात्यातल्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

बारामती लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलाय. गेले अनेक दिवस बारामती लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असेल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसेनेचे विजय शिवतारे, उषा काकडे अशा वेगवेगळ्या नावांची चर्चाही भाजपकडून होत होती. मात्र भाजपने दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी कांचन कुल या पवार कुटुंबीयांच्या जवळच्या नातेवाईक असल्याची चर्चाही झाली. मात्र त्यांच्यातलं नेमकं नातं काय याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.

बारामती तालुक्यातल्या वडगाव निंबाळकर येथील राजेनिंबाळकर या घराण्याचं मोठं प्रस्थ आहे. हे कुटुंब उस्मानाबादच्या पाटील कुटुंबीयांशी संबंधित आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही उस्मानाबादच्या पाटील कुटुंबातील सदस्य आहेत. वडगाव निंबाळकर येथील विजयसिंह उर्फ कुमारराजे निंबाळकर हे त्यांचे चुलत बंधू आहेत. तर कांचन कुल या विजयसिंहांच्या कन्या. कांचन कुल यांनी बारामतीजवळच असलेल्या शारदानगर शैक्षणिक संकुलात आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलंय. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या त्या पत्नी आहेत. कांचन यांच्या लग्नासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत कुल कुटुंबीयांशी सोयरीक जुळवली होती.

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांच्या नात्याने नणंद लागतात. सध्याच्या लढतीचं चित्र पाहिलं तर आत्याच्या नणंदेविरोधात कांचन कुल या निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही लढत चांगलीच चर्चेची ठरली आहे.

नात्याच्या या लढतीबद्दल सुप्रिया सुळे यांना काय वाटतं?

कांचन कुल या आपल्या नातेवाईक आहेत हा भावनिक विषय नसल्याचं सुप्रिया सुळे सांगतात. 22 लाख मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणं ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना संपूर्ण अभ्यास करुनच जायचं हे आपण शिकलोय. त्याच अनुषंगाने आपण ही निवडणूक लढवत असल्याचं सुप्रिया सुळे सांगतात.

नाती नात्यांच्या जागी – कांचन कुल

सुनेत्रा पवार या आपल्या आत्या आहेत. उस्मानाबादमध्ये राणा जगजितसिंह आणि ओमराजे निंबाळकर हे माझे चुलत बंधू समोरासमोर निवडणूक लढवत आहेत. तर मला भाजपने बारामतीतून उमेदवारी दिली आहे. सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवत असले तरी राजकारणाच्या जागी राजकारण आणि नात्यांच्या जागी नाती ठेवूनच आपण काम करीत आहोत, असं कांचन कुल सांगतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *