नाशिक विभागात भाजपचा उमेदवार ठरेना; काँग्रेसच्या तांबे यांनी अर्ज दाखल न केल्यानं निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार?

नाशिकच्या पदवीधर मतदार संघात भाजपचा उमेदवार जाहीर होत नसल्याची स्थिती आहे, तर कॉंग्रेसकडून अद्यापही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही.

नाशिक विभागात भाजपचा उमेदवार ठरेना; काँग्रेसच्या तांबे यांनी अर्ज दाखल न केल्यानं निवडणुकीत नवा ट्विस्ट येणार?
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 11, 2023 | 9:05 AM

नाशिक : विधानपरिषदेच्या काही जागांसाठी राज्यात काही विभागात निवडणूक पार पडत आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, नाशिकमध्ये अवघ्या 3 अपक्षांनी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थी असल्याने अर्ज दाखल केले जातील अशी शक्यता अधिक होती, त्यानुसार प्रशासकीय स्तरावर तयारी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही निवडणुकीचा माहोल तयार झालेला नाही. कॉंग्रेसकडून सलग तीन वर्षे आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांनीही अर्ज दाखल केला नाहीये. तर भाजपाकडून अद्यापही उमेदवारच घोषित न झाल्याने उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांच्यासमोर उमेदवारी करायला कुणीही तयार होत नसल्याची चर्चा आहे. पदवीधर मतदार संघ हा पाच जिल्ह्यांचा असतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रचार आणि त्याकाळात असलेली प्रचार यंत्रणा उभी करण्यासाठी लागणारा वेळ शिल्लक नसल्याने अनेकांनी हातवर केल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून तसे राजेंद्र विखे , मीनाक्षी पाटील , धनंजय विसपुते यांच्या नावाची चर्चा आहे, भाजपकडून राजेंद्र विखे यांनाच गळ घातली जात आहे.

तर कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांचेच नाव निश्चित आहे, त्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीत सत्यजित तांबे यांनाच पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती.

त्यामुळे भाजपकडून थेट सत्यजित तांबे यांनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेसचा झेंडा धरलेले तांबे यांची भूमिका काय हे अद्याप उघड झालेले नाही.

बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे हे एकमेकांचे नातलग आहेत, सत्यजित तांबे हे युवा कार्यकर्ते असल्याने त्यांनाच पक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास भाजपाचा विजय सुखर होईल अशी स्थिती आहे.

सध्याची पदवीधर संघाची निवडणूक पाहता उमेदवारीच जाहीर होत नसल्याने शेवटच्या क्षणी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भाजपच्या खेळीकडे आणि तांबे यांच्या भूमिकेवर सर्व बाबी अवलंबून आहे.