ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘आधी वाभाडे काढले, कपडे फाडले, आता…’
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूमधील आधीच्या वादाचं उदाहरण देत पलटवार केला आहे.

मुंबईत ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात गर्जना मोर्चाची हाक दिली होती. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या सभेतून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाच्या त्रुटी शोधून काढल्या. गर्जना मोर्चातून टीकाटिप्पणी झाल्यानंतर आता भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंमध्ये झालेल्या जुन्या वादाचं उदाहरण देऊन जोरदार पलटवार केलाय.
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडलं. आशिष शेलार म्हणाले, ‘दुर्बळ पक्षाने मोर्चे काढले.दोन भावांचे पक्ष होते. आणि दुर्बळ पक्ष आता नावासाठी देखील उरले नाहीत. दुर्बळ आणि दुर्मिळ पक्षाचा मोर्चा होता. आज जागतिक प्राणी दिन आहे. सामान्य नागरिकांना जागतिक प्राणी दिनाच्या शुभेच्छा देताना मला सहज मोर्चा बघितल्यावर हा गर्जना मोर्चा नसून कोल्हेकुईचा मोर्चा होता. कोल्हेकुई यासाठी की, हे विरोधी पक्षातील नेते निवडणूक आयोगावर बोट दाखवतात, परंतु आरोप जिंकणाऱ्या भाजप आणि सरकार करत आहे’.
तुमच्यासारखं मतमतांतर झाल्यानंतर एकमत झालं, शेलारांची टीका
‘स्वत: निवडणूक जिंकले नाही. त्यामुळे त्याचं खापर आयोगावर फोडत आहे. याचे वर्णन असे करेल की, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. तिथे जमलेला कळप हा लबाडांचा कळप आहे. सुरुवातीला विषय हा आयोगाची कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. नंतर आयोगातील मतमतांतर, खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना सांगण्याची गरज नाही. मतमतांतर झाल्यानंतर झालेलं एकमत. खरंतर तुम्ही एकमेकांकडे बघा. तुम्ही एकमेकांवर टीका केली. मध्यंतरी फारकत घेतली. जाहीर टीका केली. वाभाडे काढले. कपडे फाडले. आता एकत्र येऊन सहमती करतात. जसं उद्धव आणि राज ठाकरेंचा पक्ष काम करतो. त्याचप्रकारे निवडणूक आयोगाचं मतमतांतर झाल्यानंतर एकमत झालं. हाच संविधानाचा दागिना आहे, असे आशिष शेलार पुढे म्हणाले.