केंद्रीय राज्यमंत्रीपद देतो, 20 कोटी द्या; भाजप नेत्याला गंडवायला गेले अन् स्वतःच सापळ्यात अडकले, काय घडलं?
यवतमाळमध्ये भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचे आमिष दाखवून २० कोटी ५० लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. भुतडा यांनी रचलेल्या सापळ्यात ठग रंगेहाथ पकडले गेले असून ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या विविध महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्ती करुन थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळवून देण्याच्या बहाण्याने भाजपच्या जिल्हा समन्वयकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप जिल्हा समन्वयकाला तब्बल २० कोटी ५० लाख रुपयांचा गंडा घालण्यात प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि रचलेल्या सापळ्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी लौकिक फुलकर नावाच्या संशयिताने नितीन भुतडा यांच्याशी व्हॉटस्ॲपवर संपर्क साधला. त्याने केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या ४२ महामंडळांची अधिकृत वाटणारी यादी, त्यांचे बजेट, वेतन आणि मिळणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती नितीन भुतडा यांना पाठवली होती. या यादीपैकी कोणत्याही ३ महामंडळांची निवड केल्यास तेथे नियुक्ती करून देण्याचे आमिष त्याने दाखवले. या संपूर्ण कामासाठी २० कोटी ५० लाख रुपयांचा खर्च येईल आणि सुरुवातीला ५ टक्के टोकन रक्कम द्यावी लागेल, असे चोरांनी सांगितले.
टोकन मिळाल्यानंतर दिल्लीत बोलावून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी बतावणीही त्यांनी केली. या व्यवहारासाठी गणेश राठोड नावाच्या व्यक्तीचा मुख्य सूत्रधार म्हणून उल्लेख करण्यात आला होता. यानंतर २२ आणि २३ मे रोजी संशयित गणेश राठोड आणि विश्वजित राठोड यांनी भुतडा यांच्याशी फोनवर आणि प्रत्यक्ष भाजप कार्यालयात भेटून चर्चा केली. मात्र, भुतडा यांना या सर्व प्रकारावर संशय आला. त्यांनी ठगबाजांना रंगेहाथ पकडण्यासाठी माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयात स्पाय कॅमेरा लावला.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
३० मे रोजी सकाळी टोकन रक्कम देण्यासाठी ठगांना कार्यालयात बोलवण्यात आले. भुतडा यांनी एका बॅगेत रद्दी भरून त्यावर विश्वास बसण्यासाठी ५० हजार रुपयांच्या खऱ्या नोटा ठेवल्या. ठरल्याप्रमाणे आरोपी लौकिक फुलकर आणि विश्वजित राठोड कार्यालयात पोहोचले. त्यांनी भुतडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर पैशांची बॅग ताब्यात घेतली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर, नितीन भुतडा यांनी तातडीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
भुतडा यांच्या तक्रारीवरून ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी लौकिक जगन्नाथ फुलकर, गणेश लालसिंग राठोड, विश्वजित सुरेश राठोड या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या हायप्रोफाइल प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ चांगलीच उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.