
महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे, नितेश राणे यांच्या या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एवढंच नाही तर खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला देखील तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला, असं देखील यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ‘खऱ्या अर्थानं सत्तेचा गैरवापर काय असतो? प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्याला देवेंद्र फडणवीस यांच्या सकट खोट्या गुन्ह्यात अडकून जेलमध्ये कंस टाकायचं? हा एक कलमी कार्यक्रम सुरू होता, कोरोनाच्या काळात आपला महाराष्ट्र आधोगतीकडे जात असताना, उद्धव ठाकरेंचा कारभार नियोजन शून्य होता. तर दुसऱ्या बाजुला आपल्या सर्व विरोधी नेत्यांना राजकीय प्रतिस्पर्ध्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम उद्धव ठाकरेंचं सरकार जे काय करत होतं, त्याचा बुरखा फाडण्याचं काम झालेलं आहे.’ असं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटानं काही ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची एकत्र पत्रकार परिषद पार पडली यावर देखील नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे मुद्दे आहेत. ते संयुक्तपणे पुणे पालिका लढवीत आहेत. म्हणून त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, असं यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा बंद होऊ नयेत, आणि कोकणासाठी निकष वेगळे लावा हा माझा आग्रह आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आपल्या जिल्ह्याच्या गावागावातील शाळा बंद होता कामा नये आणि शासन म्हणून आमचा प्रयत्न असेल की जे निकष मराठवाडा, विदर्भाला आहेत, ते कोकणाला नको यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे. एकूण 12 सभा आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी सगळीकडेच जाणार आहे, अशी माहितीही यावेळी राणे यांनी दिली.