
Manikrao Kokate : बनावट कागदपत्रे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील घरे लाटल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यानंतर आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी केली जात होती. विरोधकांचा तसेच जनतेचा वाढता दबाव लक्षात घेता राज्य सरकारने कोकाटे यांच्याकडील मंत्रिपद काढून घेतले आहे. सोबतच कोकाटे यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. सध्यातरी कोकाटे यांच्या खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. असे असतानाच आता भाजपाने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारने कोकाटेसंदर्भात निर्णय घेतला आहे. सरकारच्या प्रतीमेच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे. सरकार टप्प्याटप्प्याने भूमिका घेईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनच करावे लागेल. कोर्टाने निर्णय घेतल्यावर वाट न बघता निदान खातं बदलून दखल घेतल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे मंत्रिपदाचं काय होईल, हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.
तसेच, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांच्याकडील खाते काढून घेतले आहे. या निर्णयाचे आपण स्वागतच करायला हवे. हा निर्णय घेतला नसता तर जनतेने अनेक प्रश्न उपस्थित केले असते. अजितदादा आणि मुख्यमंत्री टप्प्या-टप्प्याने निर्णय घेतील, याची मला खात्री आहे, असेही दरेकर म्हणाले.
कोकाटे हो लोकप्रतिनिधी आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री आहेत. त्यामुले घाई-घाईने निर्णय घेणे चुकीचे आहे. त्यामुळे लगेच निर्णय घेतला तर कायद्याच्या चौकटीत काय आहे? दुसरा काही पर्याय आहे? याबाबत विचार करणे गरजेचे आहे. तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे काही निर्णय विचार करून घ्यावे लागतात. सध्या कोकाटे यांच्याकडे कोणतेही खाते ठेवण्यात आलेले नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
तर दुसरीकडे सरकारने हा निर्णय घेण्यासाठी फार उशीर केला, कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते दावने यांनी केला आहे. “मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. वैधानिक पदावर राहणाऱ्या व्यक्तीला शिक्षा होते, तेव्हा त्या व्यक्तीला ते पद सोडावे लागते किंवा पद काढून घ्यावे लागते. माणिकराव कोकाटे यांना वेगळा न्याय का? माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटकेचं वॉरंट आहे. असे असताना कोकाटे यांच्या संदर्भात कायद्याची अंमलबजावणी होत नाही,” असंही दानवे म्हणाले आहेत.