राजकारणात मोठ्या घडामोडी, भाजपच्या बड्या नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट, भेटीत काय ठरलं?
भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा उद्देश दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या शक्यतांवर चर्चा करणे हा होता.

सध्या राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. भाजप नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. दादरमधील ऐतिहासिक कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळीच मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समोर आले होते. त्यानुसार संध्याकाळी ५ ते ५:३० दरम्यान शिवतीर्थवर जाऊन त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून दादरमधील कबूतरखाना हा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. दादरचा कबूतरखाना हा दादर स्टेशनजवळ असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी असते. कबुतरांना दाणे खाऊ घालणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या. तसेच, वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. या कारणांमुळे, मुंबई उच्च न्यायालयाने परिसरात दाणे विकण्यास आणि कबुतरांना खाऊ घालण्यास मनाई केली होती.
दादर कबुतरखान्याजवळ जैन धर्मीयांनी आंदोलन
यानंतर काही दिवसांनी न्यायालयाने कबुतर खाने बंद करण्याचा निर्णय दिला. यानंतर मुंबईतील अनेक कबुतरखाने बंद करण्यात आले होते. यावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरु होता. दादर कबुतरखान्याजवळ जैन धर्मीयांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे राज ठाकरे कबूतरखान्याचा विषय उचलून धरत विरोध दर्शवला होता.
राजकीय वर्तुळात चर्चा
आता याच पार्श्वभूमीवर मंगल प्रभात लोढा यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे म्हटलं जात आहे. या भेटीत कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आल्याचे बोलल जात आहे. पण अद्याप या भेटीचा नेमका तपशील समोर आलेला नाही. मंगल प्रभात लोढा हे दादर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली करत असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, राज ठाकरे आणि मंगल प्रभात लोढा यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ही भेट केवळ सदिच्छा भेट नव्हती, तर एका विशिष्ट प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी झालेली चर्चा होती, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कबुतरखाना सुरु केला. त्यावेळी त्यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये एक कबुतरखाना सुरू करणार असल्याचे म्हटले होते. सध्या या वक्तव्यावरुन मंगल प्रभात लोढा यांच्या या वक्तव्यावरून वाद पेटणार असल्याची चिन्हे आहेत.
