“संजय राऊतांची प्रकृती बिघडलेली, उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये…” महायुतीतील बड्या नेत्याची टीका
"फोडाफोडी करायला लागलात तर कधी तुमचे डोके फुटेल ते कळणार नाही", असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. आता या इशाऱ्यावर महायुतीतील एका मंत्र्याने भाष्य केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यासोबतच ठाकरे गटाचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटाच्या आणि भाजपच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाला फोडाफोडीचे ग्रहण लागल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. “अरे, हिंमत असेल तर फोडून दाखवा. आता शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. फोडाफोडी करायला लागलात तर कधी तुमचे डोके फुटेल ते कळणार नाही”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. आता या इशाऱ्यावर महायुतीतील एका मंत्र्याने भाष्य केले आहे.
महायुतीतील मंत्री आणि भाजप नेते पंकज भोयर यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंना फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. ते फ्रस्टेशनमध्ये असले की अशी वक्तव्य करत असतात, असे पंकज भोयर म्हणाले.
“संजय राऊतांचे आरोग्य बरोबर नाही”
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेले होते. यावर बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल केला. संजय राऊतांचे आरोग्य बरोबर नाही. ते सकाळी मीडियासमोर येऊन काहीही बडबड करत असतात. संजय राऊत हे जबाबदार व्यक्तिमत्व असून प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्यानंतरच त्यांनी वक्तव्य करावे, असा सल्ला मंत्री पंकज भोयर यांनी संजय राऊतांना दिला.
“सुरक्षेच्या कारणावरून कुठलाही तणाव नाही”
“महायुतीच्या काही आमदारांची सुरक्षा काढण्यात आली यावर मंत्री पंकज भोयर यांना विचारले होते. यावेळी ते म्हणाले महायुतीत सर्व ऑलवेल सुरू आहे. सुरक्षेच्या कारणावरून कुठलाही तणाव नाही. सुरक्षेसाठी एक वेगळा डिपार्टमेंट असून सहा महिन्यातून बारा महिन्यातून सर्वे करून कुणाला किती सुरक्षा द्यायला पाहिजे, ते ठरवत असतात”, असेही ते म्हणाले.
योग्य पद्धतीने चौकशी सुरू
बीड जिल्ह्यातील मसाजचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत, याबद्दलही मंत्री पंकज भोयर यांनी भाष्य केले. “या प्रकरणातील जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणावर गृह विभाग अत्यंत गंभीर असून योग्य पद्धतीने चौकशी सुरू आहे”, असे पंकज भोयर यांनी सांगितले.