दोन लाखाचा चष्मा, पन्नास हजाराची चप्पल, काखेत दीड लाखांची पर्स अन् हजार रुपयाची चहा… लाडकी बहीण योजना कुणासाठी? पडळकरांनी कुणावर साधला निशाणा?

Gopichand Padalkar : लाडकी बहीण योजना ही सरकारची सर्वात लोकप्रिय योजना आहे. राज्यातील लाखो पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका महिला नेत्यावर सडकून टीका केली आहे.

दोन लाखाचा चष्मा, पन्नास हजाराची चप्पल, काखेत दीड लाखांची पर्स अन् हजार रुपयाची चहा... लाडकी बहीण योजना कुणासाठी? पडळकरांनी कुणावर साधला निशाणा?
Gopichand Padalkar
| Updated on: Nov 29, 2025 | 5:13 PM

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय योजना आहे. राज्यातील लाखो पात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. यामुळे गावा खेड्यातील महिला स्वावलंबी बनलेल्या आहेत. मात्र या योजनेवर अनेकदा विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आता यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका

अंबरनाथ मधील प्रचार सभेत बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, ज्यांच्या डोळ्यात दोन लाखांचा चष्मा, ज्यांच्या पायात पन्नास हजारांची सँडल, ज्यांच्या काखेत दीड लाखाची पर्स आणि जे मरीन ड्राइवर वर हजार रुपयांची चहा पितात, अशा बहिणींसाठी लाडकी बहीण योजना नसून; ज्या बहिणीला पन्नास रुपये देखील खर्च करायला नसतात त्या बहिणी साठी लाडकी बहीण योजना आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे.

अजित दादांना लगावला टोला

काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत अजित पवार यांनी तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत निधी मी देतो त्यामुळे घड्याळाला मतदान करा, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना गोपीचंद पडळकर यांनी, ‘तिजोरी जरी तुमच्याकडे असली, त्याच्या चाव्या जरी तुमच्याकडे असल्या तरी, तिजोरी ज्या खोलीत आहे आणि तुम्ही ज्या खोलीत राहता त्या खोलीचे मालक आमचे आहेत अशा शब्दात अजित पवार यांना टोला लगावला आहे.

भाजपला निवडून द्या, मतदारांना आवाहन

पुढे बोलताना पडळकर यांनी, ‘अंबरनाथमध्ये माझी सभा आहे म्हणून सभेला कोणी जायचं नाही अशा धमक्या इथल्या मतदारांना दिल्या गेल्या होत्या. हे भाजपचे सरकार आहे, आमचे सरकार आहे तिथे लोकशाही आहे, कोणाची मोगलाई लागून गेली नाही. त्यामुळे अंबरनाथमध्ये भयमुक्त वातावरण करायचे असेल तर भाजपला निवडून द्या असं आवाहनही उपस्थित मतदारांना केले.