
BMC Mayor Election : राज्यात महापालिकेची निवडणूक संपली आहे. राज्यभरातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी ही निवडणूक झाली होती. यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाला जास्त जागा असल्या तरीही अनेक ठिकाणी भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत गाठता आलेले नाही. त्यामुळेच भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात युती होत आहे. मुंबई, ठाणे, जळगाव अशा अनेक ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. दरम्यान, या सर्व घडामोडींदरम्यान मुंबईचा महापौर कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. असे असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपाकडून अखेर शिंदे यांच्या शिवसेनेकडे एक महत्त्वाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे लवकरच मुंबईत महापौर निवडला जाऊ शकतो.
मुंबईत महापौरपदाची निवड करण्यासाठी महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनात शिंदे यांच्या पक्षाने भाजपाकडे अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केल्याचे सांगितले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दावोसच्या दौऱ्यावर असल्याने महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. असे असतानाच आता भाजपाने एक मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकत्रित गट स्थापन करून त्याची नोंदणी एकत्रितपणे करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले जात आहे.
महापौर निवडताना तसेच मुंबई पालिकेचा कारभार हाकताना आपली ताकद राहावी. बहुमताचा आकडा आणखी भक्कम राहावा यासाठी भाजपाकडून शिंदे गटाला एकत्रितपणे गट स्थापन करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावात भाजपाकडे गटनेतेपद तर शिंदे यांच्या शिवसेनेकडे प्रतोद पद देण्याचीही भाजपाने तयारी दाखवल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक आज त्यांच्या गटाची स्वतंत्रपणे नोंदणी करणार होते. परंतु ही प्रक्रिया लांबवीवर पडली आहे. असे असतानाच आता भाजपाकडून एकत्रितपणे गटनोंदणी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले जात असल्याने भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.