मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? एका कारणामुळे निवडणूक लांबणीवर, आता नवी तारीख समोर
मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची गट नोंदणी अद्याप न झाल्याने ३१ जानेवारीची निवडणूक आता फेब्रुवारीत होऊ शकते. जाणून घ्या काय आहे संपूर्ण तांत्रिक पेच.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. तरी अद्याप मुंबईत महापौर पदाच्या हालचालींना फारसा वेग आलेला नाही. त्यातच आता मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. येत्या ३१ जानेवारी २०२६ रोजी होणारी महापौर पदाची निवडणूक आता फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीतील घटक पक्षांची म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची अद्याप विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट नोंदणी झालेली नाही. त्यामुळे हा विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर गट नोंदणीचा पेच कायम आहे. महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गट म्हणून नोंदणी करणे आवश्यक असते. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत पक्षादेश (व्हीप) लागू करता येत नाही. भाजपकडे सध्या ८९ नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे २९ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांच्या गट नोंदणीबाबत सध्या तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे.
तर दुसरीकडे सध्या महायुतीत महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद यावरून अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या सोडतीनुसार, मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्ग – महिला या गटासाठी आरक्षित झाले आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत.
महापौर निवड प्रक्रिया कशी पार पडते?
मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार, महापौरांची निवड एका विशिष्ट कायदेशीर चौकटीत केली जाते. याबद्दल पालिका सचिव आयुक्तांशी चर्चा करून निवडणुकीची तारीख ठरवतात. यासाठी एक विशेष सभा बोलावली जाते. या सभेची सूचना सर्व नगरसेवकांना किमान ३ दिवस आधी देणे बंधनकारक आहे.
यानंतर इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज भरावा लागतो. या अर्जावर एका नगरसेवकाची सूचक आणि दुसऱ्याची ‘अनुमोदन’ म्हणून स्वाक्षरी लागते. यानंतर निवडणुकीच्या दिवशी पीठासीन अधिकारी (सहसा विभागीय आयुक्त किंवा मावळते महापौर) सभेचे कामकाज पाहतात. जर एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील, तर हात उंचावून किंवा गुप्त मतदानाद्वारे (प्रक्रियेनुसार) निवड केली जाते.
