‘एक टोल नाका फुटला म्हणून एवढी थोबाडं उघडली, पण…’, अमित ठाकरे रडारवर आल्याने मनसेचा संताप

| Updated on: Jul 25, 2023 | 11:34 AM

"भाजपावाल्यांनी आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये, आम्हाला ती व्यवस्थित करता येते आणि निभावता सुद्धा येते" असं संदीप देशपांडे म्हणाले. 'भाजपाला मुजोर टोल कंत्राटदारांची दलाली करायची आहे का ?', मनसेने थेट मुद्यालाच घातला हात.

एक टोल नाका फुटला म्हणून एवढी थोबाडं उघडली, पण..., अमित ठाकरे रडारवर आल्याने मनसेचा संताप
Amit-Thackeray
Follow us on

मुंबई : सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांचा टोल नाक्यावर अपमान झाला, म्हणून समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला असं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. मनसेच्या या कृतीला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. दादागिरी सहन करणार नाही, असं महाराष्ट्र भाजपाने म्हटलय. महाराष्ट्र भाजपाने एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टोल नाका फोडल्याच समजल्यानंतर अमित ठाकरे यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसला असं भाजपाने म्हटलय.

अमित ठाकरे खोट बोलतायत, त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना टोल नाका फोडायला भाग पाडलं, असं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. फास्ट टॅगची समस्या असल्यामुळे अमित ठाकरे यांची गाडी फक्त तीन ते साडेतीन मिनिटं थांबवली असं भाजपाच म्हणणं आहे.

‘दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वत:चा पक्ष बांधा’

महाराष्ट्र भाजपाच्या या टीकेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलय. “ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले, ते आम्हाला बांधण्याबद्दल काय शिकवावणार?. त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वत:चा पक्ष बांधावा” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

कंत्राटदारांची दलाली करायची आहे का ?

“एक टोल नाका फुटला म्हणून एवढी थोबाडं उघडली, पण मणिपूरमध्ये एवढ्या घटना घडल्या, त्यावेळी महाराष्ट्र भाजपा गप्प का होती?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. “भाजपाला मुजोर टोल कंत्राटदारांची दलाली करायची आहे का ?” असा संदीप देशपांडे यांनी प्रश्न विचारला आहे.

‘भाजपावाल्यांनी आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये’

“याच भाजपा-शिवसेनेने 2014 मध्ये सत्तेत येताना, टोल नाके बंद करु असं म्हटलं होतं, ते आता विसरलेत का?” असं संदीप देशपांडे यांनी विचारलय. महाराष्ट्रात अशी दादागिरी चालणार नाही, असंही भाजपाने म्हटलय. त्यावर “हे आम्हाला भाजपाकडून शिकण्याची गरज नाही. आम्हाला जे कळतं, ते आम्ही करतो. भाजपावाल्यांनी आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये, आम्हाला ती व्यवस्थित करता येते आणि निभावता सुद्धा येते” असं संदीप देशपांडे म्हणाले.