
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक, सर्वत पक्षांनी निवडणुकीसाठी कसून तयारी सुरू केली असून, जागावाटप, उमेदवारी या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून आता उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरूवात झाली आहे. अख्ख्या राज्याच लक्ष लागलेली मुंबई महापालिका निवडणूक अतिशय महत्वाची ठरत असून ही जिंकण्याचाच भाजपचा निर्धार असून त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती होणार आहे. मात्र असं असलं तरी ठाण्यात स्वबळावर लढण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन आणि तीन हात नाका परिसरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बॅनर लावून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. नमो भारत नमो ठाणे असा उल्लेख असलेले हे बॅनर कमळाच्या चिन्हासह सगळीकडे दिसत आहेत. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक धक्कादायक दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाला ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा पराभव करायचा आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानाने नवी खळबळ माजली आहे.
काय म्हणाले राऊत ?
ठाण्याचं महत्व यावेळी वेगळं आहे . भाजपला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा आहे, एवढंच मला माहीत आहे. आणि त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधले निकाल वेगळे होते, ती गणितं वेगळी होती. मात्र आता भारतयी जनता पक्ष आणि शिवसेना-मनसे युती यांच्यामध्ये लढाई होईल, असं राऊत म्हणाले.
शिवसेना भवनासमोर लावलेल्या बॅनरवरही केली टिप्पणी
एकीकडे ठाण्यात राजकीय प्रचाराला सुरुवात झाली असताना, दुसरीकडे मुंबईतील शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीयांकडून पुन्हा एकदा बॅनरबाजी करण्यात आली आहे. उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे #BMC असा आक्रमक आशय या बॅनरवर छापण्यात आला आहे. उत्तर भारतीय सेनेने लावलेल्या या बॅनरमुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे भारतीय पक्षाचे धंदे आहेत. कुणी निंदा, कुणी वंदा माझं नाव धंदा, तसं त्यांचं सुरू आहे. ते ( भाजप)लोक काही सुधारणार नाहीत. खुनी, बलात्कारी, भ्रष्टाचारी असे लोक त्यांची ताकद आहे. आणि त्यांच्या पक्षात असे सगळे लोक घेऊन ते अशा प्रकारचे धंदे करतात, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं