
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आहे . राज्यात महायुतीचे एकूण 213 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाहीये, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान या निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत, तसेच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
या निवडणुकीमध्ये भाजपचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तर युतीचे 74 टक्क्यांपेक्षा अधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. भाजपचे नगरसेवक 2017 मध्ये नंबर एक होतो. 1602 नगरसेवक होते. आता 3395 नगरसेवक निवडून आले आहोत. 48 टक्के भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. आम्हाला प्रचंड मोठं जनसमर्थन मिळालं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या पक्षानेही चांगला परफॉर्मन्स दिला आहे. आम्ही एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स याठिकाणी कायम ठेवला आहे . रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत मोठं यश मिळालं, त्यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्या पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्री आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली. पक्ष आणि संघटनेत चांगला संवाद निर्माण झाला. त्यामुळे अभूतपूर्व विजय मिळाला आहे. 2017 पेक्षाही मोठा विजय मिळाला आहे. गेल्या 20-25 वर्षांमध्ये राज्याच्या इतिहासात इतका मोठा विजय कुणाला मिळाला नसेल. एवढा मोठा विजय आम्हाला मिळाला. मी नागरिकांचे आभार मानतो. या निवडणुकीत मी सकारात्मक प्रचार केला, असंही यावेळी फडणवीस म्हणाले, दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे, विरोधक निवडणुकीत प्रचारासाठी बाहेरच पडले नाहीत, त्यामुळे ते आता म्हणतील आम्ही ही निवडणूक फार गांभीर्यानं घेतली नव्हती असा टोला यावेळी फडणीस यांनी लगावला आहे.