
BMC Mayor Election : राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत बहुसंख्या महापालिकांत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर अनेक ठिकाणी महायुतीचा महापौर बसणार आहे. परंतु सर्वाचे लक्ष हे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाकडे लागले आहे. येथे नेमका भाजपाचा महापौर होणार की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापौरपद दिले जाणार, असे विचारले जात आहे. विशेष म्हणजे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. बहुमत हे चंचल असते. ते आज असते तर उद्या नसते, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाल आहेत. राऊतांच्या या विधानानंतर राजधानी मुंबईत ठाकरे गटही महापौरपदासाठी आणि सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने भाजपाकडे अडीच वर्षे महापौरपदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. यावरच आता भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या एकनाथ शिंदे यांचे निवडून आलेले सर्व नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स या पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आता शिवसेनेकडून भाजपाकडे अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, असे सांगितले जात आहे. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या दौऱ्यावर आहेत. असे असताना मुंबईत अनेक घडामोडी घडत आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेच्या याच कथित प्रस्तावावर बावनकुळे यांनी सविस्तर सांगितले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे यांचे नगरसेवक डांबून ठेवण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला गेली आहे, अशी टीका सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर केली. यालाही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी अगोदर स्वत:चे मगरसेवक सांभाळावेत. त्यांचे एवढे सारे आमदार निघून गेले. जे आमदार सांभाळू शकलेले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळतील. त्यांनी आमची चिंता करू नये. आम्ही आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने सांभाळतो, असा टोला भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. तसेच एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांसाठी गेट टुगेदर ठेवले होते. त्यासाठीच सर्वांना हॉटेलवर बोलवण्यात आले. यात चुकीचे काहीही नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.