
मुंबईतील आगामी बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनमताचा आढावा घेणारे सर्वेक्षण विकली वाईबने केले आहे. या सर्व्हेक्षणातील आकडेवारी मनोरंजक आहे. येऊ घातलेल्या मुंबई महानगर महापालिका निवडणूकांत सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत भाजपा सर्वात आघाडीवर आहे. तर शिवसेनेत फूट पडून देखील उद्धव ठाकरे यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे आकडेवारी या सर्वेक्षणात पुढे आली आहे. नगरसेवक आणि प्रशासक दोन्हींच्या प्रगती पुस्तकावर मुंबईकरांनी लाल शेरे मारलेले आहेत आणि महत्वाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालविण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले तर त्यांना मुंबईकरांचा मोठा पाठिंबा या सर्वेक्षणातून मिळाला आहे.
या सर्वेक्षणात तुमच्या स्थानिक नगरसेवकाच्या कामगिरीवर खुश आहात काय ? अशा विचारलेल्या प्रश्नावर तब्बल २८.९ टक्के मुंबईकरांनी संपूर्ण असमाधानी असे म्हटले आहे. तर २०.९ टक्के मुंबईकरांनी नगरसेवकांची कामगिरी संपूर्ण समाधानी असल्याचे म्हटले आहे. १८.७ समाधानीही नाही आणि असमाधानीही नाही असे म्हटले आहे. तर १२.२ टक्के मुंबईकरांनी सांगू शकत नाही असे म्हटेल आहे. वयोगटाचा विचार करता १८-२४ वयोगटातील ३९ टक्के तरुणांनी स्थानिक नगरसेवकांची कामगिरी समाधानकारक असे म्हटले आहे.तर नगरसेवकांची कामगिरी असमाधानकारक असल्याचे २५-३४ वयोगटातील ३६ टक्के तरुणांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेचा शिवसेनेचा महापौर असतानाच्या साल २०१७ ते २०२२ च्या काळाच्या तुलनेत आताची एनडीएची प्रशासकीय राजवट कशी आहे का ? या प्रश्नाला २०.० टक्के मुंबईकरांनी सर्वात वाईट असे म्हटले आहे. तर १९.९ टक्के मुंबईकरांनी बऱ्याच प्रमाणात चांगली म्हटले आहे. तर १७.१ टक्के मुंबईकरांनी सारखीच असल्याचे म्हटले आहे. पालिकेतील एनडीएची प्रशासकीय राजवट आधीपेक्षा चांगली म्हणणाऱ्यात ४३ टक्के पुरुष तर ३२ टक्के महिला आहेत. वाईट म्हणणाऱ्यात पुरुष आणि महिलांचे प्रमाण ३६ टक्के असे समान आहे. वयोगटाचा विचार करता आताची प्रशासकीय राजवट आधीपेक्षा उत्तम असल्याचे ५५ वयोगटाच्या पुढील ५० टक्के नागरिकांनी म्हटले आहे.
३ ) जर बीएमसीच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या कोणाला पाठींबा ?
या प्रश्नावर ३१.० टक्के लोकांनी भाजपाला पाठींबा दिला. तर २३.९ टक्के लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असे म्हटले आहे. तर एकनाथ शिंदे यांना ६.३ टक्के लोकांना पाठींबा दर्शवला आहे. तर मनसेला ११.२ टक्के लोकांनी पाठींबा दिला आहे.
४ ) मुंबईकरांना कोणती समस्या अधिक महत्वाची वाटतोय ?
अनुक्रमे रस्त्यावरील खड्डे – १९.५ टक्के, पाणी तुंबणे – १४.३ टक्के, वाहतूक समस्या – १०.६ टक्के, अपुरी शौचालय – १६.१ टक्के, पिण्याची पाणी – ११.१ टक्के, झोपडपट्टी – ४.७ टक्के, इतर -९.६ टक्के, सांगू शकत नाही – १४.३ टक्के अशी प्रतिक्रीया दिली आहे.
५ ) बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पाठींबा द्याल का?
या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला – २६.२ टक्के, राज आणि उद्धव ठाकरे युती – ५२.१ टक्के, काही सांगू शकत नाही असे २१.८ टक्के लोकांनी म्हटले.