Maharashtra Election News LIVE : शिंदेंनी नगरसेवकांना कोंडून ठेवले-संजय राऊत

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने ११४ चा बहुमताचा आकडा पार करत ऐतिहासिक विजय मिळवला असून, २५ वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ग्रामीण आणि शहरी भागातील या राजकीय संघर्षाचे संपूर्ण अपडेट्स वाचा एका क्लिकवर.

Maharashtra Election News LIVE : शिंदेंनी नगरसेवकांना कोंडून ठेवले-संजय राऊत
breaking news
| Edited By: | Updated on: Jan 18, 2026 | 11:28 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 18 Jan 2026 11:58 AM (IST)

    पालकमंत्र्याच्या मुलीनेही विजय मिरवणुकीत फिरवली तलवार

    महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर गुलाल उधळण्याच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचे धिंडवडे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिंदेसेनेकडून विजयी झालेल्या उमेदवारांसह पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजीत जीवनवाल यांनी भररस्त्यात तलवारी नाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अभिजीत जीवनवाल याच्याविरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा शिरसाट यांनी देखील तलवार फिरवल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष लागले आहे.

  • 18 Jan 2026 11:51 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीत निम्म्या प्रभागात क्रॉस वोटिंग? पुरावा समोर

    एक घड्याळाला मत द्या आणि तीन कमळाला मतं द्या. पिंपरी चिंचवडमधील मतदारांना क्रॉस वोटिंग करा,असं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ समोर येतोय. या अजित पवार राष्ट्रवादीच्या प्रभाग 32 मधून नगरसेविका झालेल्या उज्वला ढोरे आहेत. असा दावा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ने केलाय.त्या आमच्यामुळं नगरसेविका झाल्या मात्र त्यांच्यामुळं प्रभागातील तीन उमेदवारांचा पराभव झालाय. भाजपच्या प्रशांत शितोळे विरोधात राष्ट्रवादीच्या अतुल शितोळे यांचा अवघ्या 290 मतांनी पराभव झाला. यानंतर पक्षाने मतदारसंघात चौकशी केली. त्यानंतर उज्वला ढोरेंनी क्रॉस वोटिंगचा प्रचार केल्याचा दावा करत राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर आरोप ही करण्यात आलेत.

  • 18 Jan 2026 11:42 AM (IST)

    मतमोजणी केंद्रावरील दारुड्या कर्मचाऱ्यावर गुन्हा

    नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर मद्यपी कर्मचाऱ्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. अंबड पोलिसात संशयित पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली.15 जानेवारीला मतमोजणीच्या दरम्यान अंबड येथील राजे संभाजी स्टेडियम येथे ललित पाटील हे मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले होते. निवडणूक वाहतूक व्यवस्थापन कामाकरता कर्तव्यावर असताना पाटील मद्यधुंद अवस्थेत होते. मद्यप्राशन केलेले कर्मचारी पाटील यांच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली आहे.

  • 18 Jan 2026 11:33 AM (IST)

    माझा कोणी ड्राइव्हवर नाही-सरसंघचालक मोहन भागवत

    माझा कोणी ड्राइव्हवर नाही. नरेंद्र मोदी, तुम्हाला मला चालवणारी एकच शक्ती. त्या ड्रायव्हरच नाव धर्म आहे असे वक्तव्य आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सृष्टी बनली तेव्हा धर्म बनला.जोपर्यंत भारताला धर्म चालवेल तो पर्यंत भारत विश्वगुरु राहील.देशाचे पंतप्रधान बोलतात संतांना नाही बोलण्यासाठी संकोच होतो. आम्ही चौकीदारी करणारे लोक आहोत, असे ते म्हणाले.

  • 18 Jan 2026 11:21 AM (IST)

    खडकी–डोंगरगावात आदमखोर बिबट्या जेरबंद, 9 दिवसांचा आतंक संपला

    गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) परिसरात आदमखोर बिबट्याचा आतंक अखेर संपला आहे. 9 जानेवारी रोजी 14 वर्षीय मुलावर हल्ला करून बिबट्याने त्याचा बळी घेतल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण होते. बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक गावांमध्ये मुलांना शाळेत पाठवणे बंद करण्यात आले होते. वन विभागाने सलग 9 दिवस सघन शोध मोहीम राबवून 17 जानेवारी रोजी सायंकाळी खडकीजवळील तलाव परिसरात आदमखोर बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून जनजीवन पूर्वपदावर येण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

  • 18 Jan 2026 11:12 AM (IST)

    इराणी महिलेला जळगावात आश्रय, पोलिस सतर्क

    जळगावच्या धरणगाव येथे इराणी महिलेसह तिच्या तीन वर्षाच्या मुलाला बेकायदेशीररीत्या आश्रय दिल्या प्रकरणात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्यात इराणी महिलेला आश्रय देणाऱ्या तसेच मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. महिलेला आश्रय देणारे संशयित आरोपींनी पाकिस्तानमध्ये सलमान भाई आणि सलमान खान नामक व्यक्तींना आंतरराष्ट्रीय व्हिडीओ कॉल व व्हॉट्सॲप कॉल, चॅटिंग केल्याचे उघड झाले आहे.

  • 18 Jan 2026 11:01 AM (IST)

    काँग्रेसच्या नगरसेवकांचे भाजप उमेदवाराला मतदान

    खुलताबाद नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला मतदान केले. काँग्रेसने आपल्या चार नगरसेवकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत भूमिकेला विरोध करत चार नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार नवनाथ बारगळ यांना मतदान केले होते. काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केल्यामुळे भाजपाचे नवनाथ बारगळ विजयी झाले होते. या प्रकरणी काँग्रेस तालुका अध्यक्षांनी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे प्रस्ताव पाठवला, आणि हा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे

  • 18 Jan 2026 10:55 AM (IST)

    नाशिक शहरासह राज्यभरातील उत्तर भारतीय गोदा घाटावर स्नानासाठी

    नाशिकचा रामकुंडावर मौनी अमावस्या निमित्ताने उत्तर भारतीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नाशिक शहरासह राज्यभरातील उत्तर भारतीय गोदा घाटावर स्नानासाठी. मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेतच स्नान करून दानधर्म करण्याला महत्व. त्यामुळे पहाटेपासूनच नाशिकच्या रामकुंडास सह गंगा घाट परिसरात उत्तर भारतीयांची स्नानासाठी आणि पूजा विधीसाठी मोठी गर्दी

  • 18 Jan 2026 10:50 AM (IST)

    नागपुर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का..

    अजित पवार गटाच्या एकमात्र नगर सेवक म्हणून प्रभाग 21 मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी आज जनतेचे आभार मानण्यासाठी काढली आभार रैली. शांती नगर परिसरात काढली जोरदार रैली. जनतेने माझ्यावर विस्वास दाखविला मी जनतेचा विस्वास खरा करून दाखविणार. माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषी , आणि पैशाचा वापर केला असे आरोप लावले होते

  • 18 Jan 2026 10:30 AM (IST)

    नवी मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात मृतांची संख्या 5 वर

    सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या देवडी पाटी येथे भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात. या भीषण अपघातात विशाल भोसले, अमर पाटील, आनंद माळी, अर्चना भंडारे, माला साळवे अशी मृतांची नावे आहेत तर ज्योती टकले ही महिला जखमी आहे. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळून झाला भीषण अपघात

  • 18 Jan 2026 10:20 AM (IST)

    मिरजेत भाजपच्या नूतन नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार

    सांगली निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकरंकडून सत्कार करण्यात आला आहे.मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अल्पसंख्यांक आघाडीचे सचिव फारूख जमादार यांच्या मातोश्री बानू जमादार यांच्यासह पॅनलचा विजय झाला आहे.या विजय उमेदवारांचा आमदार पडळकरांच्या हस्ते मिरजेत सत्कार पार पडला आहे.

  • 18 Jan 2026 10:10 AM (IST)

    शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 संशयितांवर गुन्हा दाखल

    नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून निवडून आलेल्या पूजा नवले यांच्यावर गुन्हा दाखल
    विजयी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर नवले यांच्या कार्यकर्त्यांकडून धिंगाणा घालत घरात शिरून अश्लील कृत्य आणि आग लावण्याचा प्रयत्न. शिंदे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह 15 ते 20 संशयितांवर गुन्हा दाखल

  • 18 Jan 2026 09:57 AM (IST)

    महापौरांच्या निवडीशिवाय नगरसेवकांना एन्ट्री नाही, आरक्षणाच्या सोडतीनंतरच पुण्याचा प्रथम नागरिक ठरणार

    पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवूनही नवनियुक्त नगरसेवकांना मान-सन्मान स्वीकारण्यासाठी आणखी २० ते २२ दिवस वाट पाहावी लागणार आहे. राज्य शासनाने महापौर पदाची आरक्षण सोडत अद्याप जाहीर न केल्याने ही तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. येत्या तीन-चार दिवसांत आरक्षण सोडत निघण्याची शक्यता असून, त्यानंतर विशेष सभा बोलावणे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबवण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापौरांच्या निवडीनंतरच खऱ्या अर्थाने नवीन सभागृहाचे कामकाज सुरू होणार आहे.

  • 18 Jan 2026 09:50 AM (IST)

    नागपूर पालिकेत काँग्रेसचे 34 नगरसेवक; विरोधी पक्षनेतेपदासाठी चार नावांची जोरदार चर्चा

    नागपूर महानगरपालिकेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने आपल्या जागा वाढवत ३४ वर मजल मारली आहे. संख्याबळ वाढल्याने आता पालिकेत आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या शर्यतीत संजय महाकाळकर, दीपक पटेल, अभिजित झा आणि विवेक निकेसे यांची नावे आघाडीवर आहेत. लवकरच काँग्रेसचे निरीक्षक नागपुरात येऊन नवनियुक्त नगरसेवकांशी चर्चा करणार असून, त्यानंतरच ‘गटनेता’ आणि ‘विरोधी पक्षनेता’ पदावर शिक्कामोर्तब होईल. आक्रमक कार्यशैली आणि जातीय समीकरणे जुळवणारा नेता निवडण्यावर पक्षश्रेष्ठींचा भर राहण्याची शक्यता आहे.

  • 18 Jan 2026 09:43 AM (IST)

    पुणे झेडपीसाठी इच्छुकांची झुंबड, दोन दिवसांत 2 हजारांहून अधिक अर्जांची विक्री; ग्रामीण राजकारण तापलं

    पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी कंबर कसली असून, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होताना दिसत आहे. गेल्या अवघ्या दोन दिवसांत तब्बल २,२०५ अर्जांची विक्री झाली असून, त्या तुलनेत आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ५ तर पंचायत समितीसाठी ४ उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष दाखल केले आहेत. ग्रामीण भागात सध्या इच्छुकांची मोठी धावपळ सुरू असून, उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षीय स्तरावर बैठकांचा धडाका वाढला आहे. अर्जांची ही विक्रमी संख्या पाहता, यावेळेस अनेक मतदारसंघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

  • 18 Jan 2026 09:35 AM (IST)

    पुरुषांना मागे सारत ७९ महिला नगरसेविका नागपूर पालिकेत; खुल्या प्रवर्गातही मारली बाजी

    नागपूर महापालिकेत आता खऱ्या अर्थाने महिला राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत १५१ पैकी ७९ जागांवर महिला उमेदवारांनी झेंडा फडकवला असून ७२ जागांवर पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, आरक्षित जागांच्या पलीकडे जाऊन खुल्या गटातही महिलांनी आपले कसब दाखवून दिले आहे. महिलांच्या या राजकीय परिपक्वतेमुळे पालिकेचे आगामी कामकाज अधिक प्रभावी होण्याची चिन्हे आहेत.

  • 18 Jan 2026 09:24 AM (IST)

    पुणे पालिकेत नवं पर्व, तब्बल १०१ नवखे चेहरे आणि ८९ महिला नगरसेविकांकडे शहराचा कारभार

    पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीतून शहराला एक नवे आणि तरुण नेतृत्व मिळाले आहे. १६५ सदस्यांच्या सभागृहात तब्बल १०१ नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले असून, यात भाजपच्या ७५ सदस्यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, यंदा महिलांनी पालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ५० टक्के आरक्षण आणि महिला मतदारांचा वाढलेला टक्का यामुळे ८९ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. नवीन चेहऱ्यांचा उत्साह आणि महिलांचा निर्णायक सहभाग यामुळे पुण्याच्या आगामी पंचवार्षिक कारभारात विकासाची नवी दिशा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

  • 18 Jan 2026 09:15 AM (IST)

    पुण्यात थंडीची एक्झिट, उन्हाची एन्ट्री, तापमानाचा पारा चढला 

    पुण्यातील हवामानात सध्या कमालीची तफावत पाहायला मिळत आहे. पहाटेचा गारवा ओसरल्यानंतर दुपारच्या वेळी उन्हाचा पारा तीव्र होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. किमान आणि कमाल तापमानात झालेल्या या बदलामुळे थंडीचा जोर पूर्णपणे ओसरला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. काही उपनगरांमध्ये दमट हवेमुळे उकाडा असह्य होत असून, अचानक झालेल्या या हवामान बदलाचा परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे.

  • 18 Jan 2026 09:09 AM (IST)

    पुण्यात महापौर पदासाठी रस्सीखेच सुरु, भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष

    पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने आता महापौर कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक दावेदारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून गुडघ्याला बाशिंग बांधून ते तयार आहेत. मात्र, यावेळेस महापौर पदाचे आरक्षण नेमके कोणासाठी सुटणार, यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. मागील वेळी हे पद खुल्या गटासाठी असल्याने, यावेळेस अनुसूचित जाती (महिला) किंवा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षणामुळे आपली संधी हुकू नये, यासाठी अनेक इच्छुकांनी आतापासूनच देव पाण्यात ठेवले आहेत.

  • 18 Jan 2026 09:03 AM (IST)

    पुण्यातील मतदारांची नोटाला पसंती, 2 लाखांहून अधिक मतदारांनी नाकारले सर्व उमेदवार

    पुण्यातील राजकीय समीकरणे आणि उमेदवारांच्या पळवापळवीला कंटाळून पुणेकर मतदारांनी आपला कौल ‘नोटा’च्या पारड्यात टाकला आहे. सराईत गुन्हेगारांना दिलेली उमेदवारी आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या ओढाताणीवर पुणेकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सुमारे १२ टक्के म्हणजेच २ लाख १६ हजारांहून अधिक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत न देता ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. निवडणूक आयोगाच्या या सुविधेचा वाढता वापर राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खलबतं सुरू आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एकीकडे आकड्यांची जुळवाजुळव आणि दुसरीकडे अंतर्गत बंडाळी थोपवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची देखील रणधुमाळी सुरू झाली आहे. या स्थानिक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार आणि ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, मनोरंजन, क्रीडा क्षेत्राताली महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.