ओळख पटली… नावं आली समोर… उजनी बोट दुर्घटनेतील सर्व प्रवासी…
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरणात बोट उलटल्याची दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या दुर्घटनेमुळे पाण्यात बुडालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बऱ्याच काळापासून शोधकार्य सुरू होते. अखेर आज सकाळी त्या सहा जणांना शोधण्यात आलं मात्र दुर्दैवाने सर्वांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरणात बोट उलटल्याची दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. या दुर्घटनेमुळे पाण्यात बुडालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बऱ्याच काळापासून शोधकार्य सुरू होते. अखेर आज सकाळी त्या सहा जणांना शोधण्यात आलं असून दुर्दैवाने सर्वांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या टीमने सर्वांचे मृतदेह शोधून काढले. दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी अखेर सर्वांचा शोध लागला. मात्र दुर्घटनाग्रस्तांपैकी कोणीच वाचू शकलं नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
मंगळवारी संध्याकाळी वादळी वारा आणि पावसाने उजनी धरणात बोट उलटून अपघात झाला होता. त्यामध्ये सात जण पाण्यात बुडाले होते, मात्र एक जण पोहत काठाशी आला. उर्वरित व्यक्तीच्या शोधासाठी एनडीआरएफकडून तातडीने शोधमोहिम राबवण्यात आली. बुडालेल्या लोकांना शोधण्यासाठी अथक तीन दिवसप्रयत्न सुरू होते. मात्र त्यात अपयश येत होते. अखेर आज सकाळी सहाही व्यक्तींचे मृतदेह सापडले. ज्या ठिकाणी ही बोट बुडाली होती त्या परिसरात आज सकाळी एका पाठोपाठ एक असे पाच मृतदेह पाण्यावर तरंगाताना आढळून आले. तर त्यानंतर थोड्या वेळाने आणखीही एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. ही शोधमोहिम सुरू असताना उजनी जलाशयाच्या दोन्ही काठांवर बुडालेल्या माणसांचे नातेवाईक बसून होते. आपली माणसं परत येतील या आशेने ते काठावर थांबले होते. मात्र जसजसा वेळ उलटत गेला, त्यांचा धीर खचू लागला. अखेर आज सकाळी एनआरएफच्या जवानांना सहाही व्यक्तींचे मृतदेह सापडले आणि ही शोधमोहिम अखेर थांबवण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), अनुराग अवघडे (वय 35) आणि गौरव डोंगरे (वय 16), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत. – बुडालेले सर्व लोक करमाळा तालुक्यातील झरे आणि कुगांवचे रहिवाशी होते पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
नेमकं काय घडलं
करमाळा तालुक्यातील कुगाव येथील सात जणं बोटीने इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. वादळीवाऱ्याने ही बोट उलटली. बोट भीमा नदीत बुडाली. या नावेत एकूण सात प्रवासी होते. त्यात दोन लहान मुलंही होती. बोट उलटल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले, मात्र त्यापैरी एकाला पोहता येत असल्याने तो कसाबसा किनाऱ्यावर आला. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. इतरांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचे पथक तीन दिवसांपासून शोधमोहिम राबवत होते, मात्र ती अयशस्वी ठरली. उर्वरित सहा जण तर सापडले पण तोपर्यत खूप उशीर झाला होता.
चप्पल, पर्स , हेल्मेट सापडले पण..
दरम्यान धरण पात्रात जिथे बोट बुडाली त्याठिकाणी काल माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोटीने दाखल झाले. NDRF च्या बोट मध्ये बसून ते घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी 35 फूट पाण्याखाली एका खडकावर अडकली होती. त्याठिकाणी चप्पल, पर्स, हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या. नंतर पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर आज सकाळी सहाही व्यक्तींचे मृतदेह सापडले त्यात चिमुकल्यांचाही समावेश असून या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
