नववधूला होळीचा सण देऊन परतणाऱ्या डॉक्टरासह आईचा अपघातात मृत्यू, २० दिवसांवर होते लग्न

car accident: डॉक्टर निलेश रामराव माळोदे यांचा येत्या २० एप्रिल रोजी विवाह होणार होता. त्याच्या विवाहाची सर्व तयारी घरात झाली होती. नातलग आणि मित्रांना निमंत्रणपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. परंतु लग्नाआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

नववधूला होळीचा सण देऊन परतणाऱ्या डॉक्टरासह आईचा अपघातात मृत्यू, २० दिवसांवर होते लग्न
डॉ. निलेश माळोदे याचा अपघातात मृत्यू झाला.
| Updated on: Apr 01, 2024 | 8:30 AM

घरात लग्नाची तयारी सुरु होती…अवघ्या २० दिवसांवर लग्न होते…लग्न ठरलेल्या नववधूला होळीचा सण देण्यासाठी कुटुंब इंदूरला गेले होते…त्या ठिकाणी डॉक्टर वर आणि नववधूची भेट झाली…दोन्ही जण लग्नाच्या स्वप्नात होते. परंतु काळाने त्यांची स्वप्न उद्धवस्थ केली. आई-वडिलासह इंदूरवरुन परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यात डॉक्टर निलेश माळोदे आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला. अपघातात त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुठे झाला अपघात

बाळापूर येथील रहिवासी रामराव माळोदे यांचा मुलगा दंत शल्य चिकित्सक डॉ. निलेश माळोदे याचा विवाह इंदूर येथील एका मुलीशी ठरला होता. नववधूला होळीचा सण देण्याकरिता रामराव लक्ष्मण माळोदे, डॉ. निलेश माळोदे आणि सौ. संगीता रामराव माळोदे हे तिघे जण कारने इंदूर येथे गेले होते. कार्यक्रम आटपून रविवारी संध्याकाळी परत बाळापूर येथे येत असताना गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांच्या कारवर काळाने घाला घातला. नववधूच्या घरी होळीचा सण देऊन परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली. अज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर पुत्रासह आईचा जागीच मृत्यू झालाय. खामगाव ते बाळापूर मार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ रविवारी रात्री ही घटना घडली.

अज्ञात वाहनाची धडक

अकोलाकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली. या धडकेत कार तीन ते चार वेळा पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. या अपघातात डॉ. निलेश माळोदे , त्याची आई सौ. संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. निलेशचे वडील रामराव माळोदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

२० एप्रिल रोजी विवाह

डॉक्टर निलेश रामराव माळोदे यांचा येत्या २० एप्रिल रोजी विवाह होणार होता. त्याच्या विवाहाची सर्व तयारी घरात झाली होती. नातलग आणि मित्रांना निमंत्रणपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. परंतु लग्नाआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. यामुळे माळोदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.