महापालिका निवडणुकीसाठी 60:40 फॉर्म्युला, शिंदे गटाच्या आमदाराने सांगितलं गणित, प्रस्ताव काय?
नांदेड महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, शिवसेना (शिंदे गट) आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादीसोबत (अजित पवार गट) युतीसाठी 60:40 जागावाटप फॉर्म्युला मांडला आहे.

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी आता सर्वच पक्षांकडून जागांची चाचपणी सुरु झाली आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या (Nanded Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाला युतीसाठी 60:40 चा फॉर्म्युला दिला आहे.
त्या पक्षाला 60 टक्के जागा द्या
सध्या नांदेड शहरात शिवसेनेचे दोन आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाची ताकद अधिक मानली जात आहे. याच बळावर आमदार बालाजी कल्याणकर यांनी युतीसाठी एक प्रस्ताव ठेवला आहे. आमदार कल्याणकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव दिला आहे. यानुसार जिथे सत्ताधारी आमदार असेल, त्या ठिकाणी त्या पक्षाला 60 टक्के जागा द्या. तर इतर जे सत्तेतले पक्ष आहेत त्यांना 20-20 टक्के जागा द्या, असा फॉर्म्युला बालाजी कल्याणकर यांनी मांडला आहे.
नांदेड महानगरपालिकेवर 100 टक्के भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
यानुसार नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार अधिक असल्याने 60 टक्के जागा द्या. तर उर्वरित मित्र पक्षांना 40 टक्के जागा म्हणजे प्रत्येकी 20-20 टक्के द्या, असा आग्रह त्यांनी केला आहे. यानुसार नांदेड महानगरपालिकेवर 100 टक्के भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नगरपालिका निवडणुकीत युती झाली नाही, कारण जिथे भक्कम नाही तिथे युती करायची आणि जिथे भक्कम आहोत तिथे युती करायची नाही असे चालणार नाही. अशोक चव्हाण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार करतील आणि आम्ही त्या फॉर्मूल्याने चालणार आहोत, त्यांनीही चालावं असे मत बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केले.
नांदेड शहराला शिवसेनेचे दोन भक्कम आमदार आहेत, 100 टक्के जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे, नांदेड मतदारसंघातील दोन्ही आमदारांच्या पाठीशी जनता आहे. ज्याचा आमदार आहे त्याला 60 टक्के जागा दिल्या पाहिजेत. एका वार्डात पाच-पाच उमेदवार इच्छुक आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. नांदेड उत्तर मतदार संघात १२ वॉर्ड असून प्रभागनिहाय उमेदवार तयार आहेत आणि त्यांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत, अशीही माहिती बालाजी कल्याणकर यांनी दिली. दरम्यान नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड, हिमायतनगर आणि हदगाव अशा अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत.
