Harshwardhan Sapkal : सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराकडून डिफेंडर कारची ‘दिवाळी’ भेट; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची आरोपांच्या वातीला बत्ती
Harshwardhan Sapkal on Defender Car : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराने डिफेंडर कारची दिवाळी भेट दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कोण आहेत ते आमदार?

Congress Allegation on Ruling MLA : सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराने डिफेंडर कारची दिवाळी भेट दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ऐन दिवाळीतच त्यांनी आरोपांची लड लावली. त्यांनी आरोपांच्या वातीला बत्ती दिल्याने आता राज्यात ठिकठिकाणी धमाक्यांचे आवाज येतात की त्यांचा फटका फुस्स ठरतो याची चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यापासून अजूनही आक्रमक पवित्रा घेतलेला दिसत नाही. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी बीड, परभणीमध्ये पदयात्रा काढली होती. पण अजूनही त्यांना सरकारवर तोफगोळे डागता आलेले नाही. त्यातच आता त्यांनी टाकलेला हा बॉम्ब किती मोठा धमाका करतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ते 21 आमदार कोण?
बुलढाणा येथे माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा आरोप केला. सत्ताधारी 21 आमदारांना एका ठेकेदाराने डिफेंडर कार भेट दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. आता हे 21 आमदार कोण आहेत, तो गिफ्ट देणारा ठेकेदार कोण आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाआहे. याचे उत्तर लवकरच राज्याला मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काही दिवसात आरोपांचा मोठा धुराळा उडण्याची शक्यता आहे. एक डिफेंडर कार बुलढाण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. तर कदाचित 22 कार ही भेट दिल्या असतील असा चिमटा काढला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी थेट कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख कुणाकडे होता हे बुलडाणेकरांना सांगण्याची गरज नाही. पण राज्यात या कार कोणत्या आमदारांना मिळाल्या, त्यांची नावे कधी सांगणार याविषयीचे कार्ड त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
मत चोरीवर चित्रपट दाखवणार
दरम्यान मत चोरीबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चित्रपट दाखवणार आहे. उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये मतचोरीचा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा उपस्थित असतील. या चित्रपटानंतर चर्चा सत्र घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी काँग्रेस या मुद्दावर आक्रमक होताना दिसत आहे. त्यासाठी मत चोरीवर चित्रपट आणि इतर कार्यक्रम काँग्रेसने हाती घेतल्याचे दिसते. तर 1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीसह विरोधी गटातील पक्ष मोर्चा काढणार आहे. त्याची उत्सुकता असतानाच काँग्रेसने वातावरण तापवण्यास सुरुवात केल्याचे दिसते.
मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकला चलो रे चा सूर आळवणारा काँग्रेस पक्ष मत चोरीवर स्वतंत्रपणे पुढे जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस काय खेळी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी स्थानिक काँग्रेस नेत्याना कानपिचक्या दिल्या आहेत.
