लोकवर्गणीतून विधानसभा लढणारे संजय गायकवाड यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ, नेमकी प्रॉपर्टी किती?

| Updated on: Mar 29, 2024 | 6:43 PM

आमदार संजय गायकवाड यांनी काल लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात नियमानुसार त्यांनी शपथपत्रही दाखल केले. त्यात चल, अचल संपत्ती, गुन्हे, इन्कम टॅक्स संदर्भात माहिती द्यावी लागत असते. आमदार संजय गायकवाड यांनी 2019 मध्ये सुद्धा विधानसभावेळी शपथपत्र दाखल केले होते.

लोकवर्गणीतून विधानसभा लढणारे संजय गायकवाड यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ, नेमकी प्रॉपर्टी किती?
शिवसेना आमदार संजय गायकवाड
Follow us on

लोकवर्गणीतून 2019 ची विधानसभा निवडणूक लढविणारे आणि यावेळी लोकसभेचा नामांकन अर्ज भरलेले आमदार संजय गायकवाड आता 5.55 कोटी रुपयांचे मालक झाले आहेत. यातील मोठा वाटा त्यांना वडिलोपार्जित वारसा, हक्काने मिळालेली शेती आणि त्या शेतीत करण्यात आलेल्या प्लॉटिंगची बाजारभावानुसार किंमत 1 कोटी 23 लाख रूपये आहे. तसेच त्यांना आमदार म्हणून दरमहा मिळणारे 1 लाख 86 हजार रुपयांचे वेतन यामुळे त्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येते. याशिवाय शेती हे उत्पन्नाचे साधन अत्तल्याचे आमदार गायकवाड यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. आमदार गायकवाड यांचे मोठे सुपुत्र मृत्यूंजय गायकवाड यांची संपत्ती सुद्धा एकूण 1 कोटी 11 लाख 61 हजार 104 रुपये आहे. त्यांचाही व्यवसाय शेती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आमदार संजय गायकवाड यांची 2019 मध्ये 1 कोटी 63 लाख रुपये संपत्ती होती आणि त्यांच्यावर 39 लाख रुपयांचे कर्ज होते. हजारो कोटी रूपयांची विकासकामे बुलढाणा मतदारसंघात आणणारे आमदार संजय गायकवाड केवळ साडे पाच कोटींचेच मालक कसे? असा प्रश्न कुणालाही पडला असेल. 2014 मध्ये जेव्हा त्यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली होती, तेव्हा त्यांच्याकडे केवळ 15 लाख रुपयांची संपत्ती होती. त्यातही 14 लाख रुपयांचे बुलढाणा अर्बनचे कर्ज होते. आज रोजी त्यांच्यावर 21 लाख रुपयांचे वाहन कर्ज आहे.

शपतपत्रात 16 एकर शेती असल्याचा उल्लेख

आमदार संजय गायकवाड यांनी काल लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात नियमानुसार त्यांनी शपथपत्रही दाखल केले. त्यात चल, अचल संपत्ती, गुन्हे, इन्कम टॅक्स संदर्भात माहिती द्यावी लागत असते. आमदार संजय गायकवाड यांनी 2019 मध्ये सुद्धा विधानसभावेळी शपथपत्र दाखल केले होते. मागील पाच वर्षांपूर्वीची आणि आताच्या शपथपत्राची तुलना केली असता त्यांच्या संपत्तीत तीन पटाने अधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आमदार गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिसांत दोन गुन्हे दखल असल्याचे सुद्धा शपथपत्रात उल्लेख करण्यात आलाय. तसेच त्यांच्याकडे 16 एकर शेती असल्याचं सुद्धा दाखवण्यात आलं आहे.