मोठी बातमी! धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप!
समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाचे पिस्तूल काढून माझ्य डोक्यावर ठेवले आणि मला धमकावले तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केलेला आहे.

Dhananjay Deshmukh : बीडच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलवर धनंजय देशमुख यांनी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी दिली, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. धनंजय देशमुख हे मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याची टोळी सध्या तुरुंगात आहे. धनंजय देशमुख यांच्याविरोधात समाधान खिंडकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर दाखल फिर्यादीनुसार आता धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय देशमुख यांनी बंदुक त्याच्या डोक्याला लावली अन्..
मिळालेल्या माहितीनुसार समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुख यांनी आपल्या अंगरक्षकाचे पिस्तूल काढून माझ्य डोक्यावर ठेवले आणि मला धमकावले तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केलेला आहे. खिंडकर यांंनी दिलेल्या फिर्यादीनुसार हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात धनंजय देशमुख यांच्याविरुद्ध बीडमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज/डीव्हीआर जप्त केला आहे. पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
समाधान खिंडकर यांनी लाईव्ह केलेला व्हिडीओ समोर
हा गुन्हा दाखल केल्यानंतर ‘मी इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत होतो. काहीतरी गडबड होणार, असे मला वाटले होते. त्यामुळे मी इन्स्टाग्राम लाईव्ह चालूच ठेवले होते,’ असे खिंडकर यांनी सांगितले आहे. धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर समाधान खिंडकर याने शूट केलेला तो व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये समाधान खिंडकर धनंजय देशमुख यांचा व्हिडिओ लाईव्ह करत असल्याचे समोर आले आहे. यावेळी धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकांनी त्याला व्हिडिओ का काढतोय ? अशी विचारणा केल्याचेही दिसत आहे. दरम्यान धनंजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.