
मनोज जरांगे पाटील यांचं जे समर्थन करतात, त्यांच्या जवळ जातात, त्यांना ओबीसींनी एकत्र येऊन धडा शिकवला पाहिजे, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून सध्या राज्यातलं वातावरण पेटलं आहे. मात्र याचा कसा अर्थ काढायचा असा प्रश्न आज खुद्द भुजबळांना विचारण्यात आला असता,त्यांनी त्यावर सडेतोड उत्तर दिलं. त्याचा काय अर्थ काढायचा ते आमचे लोक, ओबीसीचे कार्यकर्ते योग्य अर्थ काढतील, तुम्ही काळजी करू नका असं स्पष्ट शब्दांत भुजबळ यांनी सुनावलं. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षम देण्याच्या मुद्यावरून ओबीसी समजा, नेते, कार्यकर्ते यांचा ठाम विरोध असून छगन भुजबळ यांनीही वेळोवेळी भूमिका स्पष्ट करत निषेध नोंदवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कालही त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल हे भाष्य केले होते.
यावेळी त्यांनी मनोज जरांगेंवर पुन्हा निशाणा साधला. याआधीही (त्यांची) बरीच उपोषणं झाली पण कुणीही तिथं बघत नव्हतं. त्याच्याधी त्याने (जरांगे) 23 वेळा उपोषण केलं होते, कोणीही त्याच्याकडे बघतही नव्हतं. पण पवार साहेब गेले, ते गेले म्हणून उद्धव ठाकरे तिकडे गेले आणि मग सगळेच तिथे जायला लागले, असं भुजबळांनी सुनावलं.
आम्हीसुद्धा जिवंत आहोत दाखवावं लागेल
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी आक्रमक झाले असून आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नागपूरमध्ये मीटिंग पार पडली, मुंबईतदेखील मोर्चाचा प्लान असल्याची चर्चा होती, त्याबाबत विचारल्यावर भुजबळ स्पष्टच बोलले. आम्ही सांगितलंय, मुंबईत येणार, बीडला येणार ? येणार, दिल्लीत येणार ? येणार. आम्ही आमच्या पद्धतीने ठिकठिकाणी महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज घेणार आणि आम्हीसुद्धा यात उतरणार.
कारण जर जमावापुढे आणि झालेल्या गर्दीपुढे, त्याचा जर परिणाम निर्णयावर होत असेल तर आम्हालासुद्धा दाखवावं लागेल की आम्हीसुद्धा जिवंत आहोत ना, असं म्हणत भुजबळांनी ठाम निर्धार व्यक्त केला.