अरे यार…! केस कापताना लटका राग, चंद्रपूरचा अनुश्रुत पेटकर सोशल मीडियावर हिट

केस कापताना आलेला राग, हतबलता आणि गोबऱ्या गालामध्ये भरलेली निरागसता याचा सुरेख संगम व्हिडीओत आहे

  • निलेश डहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 15:50 PM, 26 Nov 2020

चंद्रपूर : सलूनमध्ये केस कापताना गोंगाट करणारी लहान मुलं अनेकांनी पाहिली असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एका ‘चिडलेल्या’ चिमुकल्याचा व्हायरल व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सलूनमध्ये केसांची बट कापल्यानंतर ‘अरे यार…!’ असं म्हणत हा चिमुकला लटका राग व्यक्त करतो, तेव्हा बघणाऱ्यांना त्याची दया आल्यावाचून राहत नाही. चंद्रपूरच्या चार वर्षीय अनुश्रुत पेटकरचा व्हिडीओ हजारो नेटिझन्सनी शेअर केला आहे. (Chandrapur Angry Kid Baby Anushrut Petkar Viral Video on Social Media while Hair Cut)

अनुश्रुतचे वडील अनुप पेटकर यांनी सलूनमध्ये हेअर कट होत असताना त्यांच्या लेकाचा व्हिडीओ कॅमेराबद्ध केला. सहज म्हणून आपल्या सोशल मीडियावर त्यांनी अनुश्रुत व्हिडीओ शेअर केला आणि त्याला लोकप्रियता मिळाली. “अरे बापरे क्या कर रहे हो तुम, मै गुस्सा हू, मै मारुंगा तुमको, मै तुम्हारी कटिंग करुंगा, मै बहुत बडा हू” असं गाल फुगवून, डोळ्यातून पाणी काढत बोलणारा अनुश्रुत चटकन मनात घर करतो.

तीन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर शहरातील कोळसा खाणींचा भाग असलेल्या रय्यतवारी कॉलनी परिसरातील खाण कामगारांच्या वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहणारा अनुश्रुत पेटकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडीओत केस कापताना त्याला आलेला राग, त्याची हतबलता आणि गोबऱ्या गालामध्ये ठासून भरलेली निरागसता याचा सुरेख संगम झाला आहे.

हा व्हिडीओ सुमारे तीन महिन्यांपूर्वीचा आहे. मात्र गेल्या काही दिवसात तो सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाला आणि लाखो नेटकऱ्यांनी उचलून धरला. हजारो कॉमेंट्स, लाखो लाईक्स आणि शेअरचा वर्षाव करत नेटिझन्सनी या गोबऱ्या गालाच्या अनुश्रुतचे कौतुक केले आहे.

अनुश्रुतची गोड धमकी

अनुप पेटकर आणि श्रुती पेटकर यांचा हा मुलगा सध्या आपल्या आजोळी चंद्रपुरात आलेला आहे. त्याचे आई-वडील संगणक शिक्षण व्यवसायानिमित्त नागपुरात कार्यरत आहेत. गोबऱ्या गालाच्या अनुश्रुतचे घरच्यांनी याआधीही अनेक व्हिडीओ तयार केलेत. मात्र चंद्रपुरात आल्यानंतर केस कापताना त्याने दाखवलेला लटका राग आणि थेट हेअर ड्रेसरलाच मारण्याची दिलेली गोड धमकी यामुळे नेटकरी या बाळाच्या जणू प्रेमातच पडलेत. (Chandrapur Angry Kid Baby Anushrut Petkar Viral Video on Social Media while Hair Cut)

चार वर्षाचा अनुश्रुत भलताच खोडकर आहे. हा व्हिडीओ काढला जाताना त्याचा चिडलेला हावभाव बघून आईने त्याचा व्हिडीओ घेण्याची सूचना केली. मात्र सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडीओला असा उदंड प्रतिसाद मिळेल, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती.

अनुश्रुतला स्वतःच्या केसांवर खूप प्रेम आहे. एकही केस कापलेला त्याला आवडत नाही. गळलेला केस दिसला तरी पुन्हा चिकटवायला तो सांगतो, असं अनुश्रुतच्या आईने ‘टीव्ही 9 मराठी’शी बातचित करताना सांगितलं.

अनुश्रुतसोबत गप्पांचा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

“मोदींनी 15 लाख बुडवले, पण काकूंनी तक्रार केली नाही, आता 1800 ची नोट काढा” व्हायरल काकूंनंतर काका जोशात

खदखदखद लाव्हा रस… वऱ्हाडी भाषेत ऑनलाइन क्लास, मास्तर नितेश कराळे सोशल मीडियावर लोकप्रिय

(Chandrapur Angry Kid Baby Anushrut Petkar Viral Video on Social Media while Hair Cut)