चालकाची एक डुलकी, कार कठडा तोडून थेट… कार्यक्रम आटोपून घरी निघालेल्या 4 महिलांवर काळाचा घाला
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटे भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने बोलेरो पुलावरून खाली कोसळली, ज्यामध्ये तेलंगणातील कागजनगर येथील ४ महिलांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत.

राज्यात एकीकडे ख्रिसमसचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटेच्या सुमारास मोठा कार अपघात झाला आहे. या अपघातात तेलंगणा राज्यातील चार महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाला लागलेल्या एका डुलकीमुळे हा भीषण अपघात घडला.
नेमकं काय घडलं?
तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील रहिवासी असलेले हे कुटुंब नागपूर येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. दिवसभर कार्यक्रमाचा आनंद लुटल्यानंतर रात्री त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. नागपूरहून तेलंगणाकडे जात असताना २५ डिसेंबरच्या पहाटे १:३० च्या सुमारास त्यांचे बोलेरो वाहन राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ आले. यावेळी रात्रभर गाडी चालवल्यामुळे थकलेल्या चालकाला डुलकी लागली आणि एका वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.
गाडीचा अक्षरशः चक्काचूर
नियंत्रण सुटलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाचे कठडे तोडून थेट खोल खड्ड्यात कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. पहाटेची वेळ असल्याने आणि परिसरात कोणीही व्यक्ती नसल्याने तिथे सुरुवातीला मदतीसाठी कोणीही नव्हते. मात्र, अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिकांनी धाव घेतली. त्यानतंर पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली.
या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. त्यामध्ये ५५ वर्षीय अफजल बेगम, ४५ वर्षीय सायरा बानो, ४६ वर्षीय सलमा बेगम आणि अवघ्या १३ वर्षांच्या सबरीन शेख या बालिकेचा समावेश आहे. हे सर्वजण एकाच घरातील किंवा जवळच्या नात्यातील असल्याचे बोललं जात आहे. या महिलांच्या मृत्यूने कागजनगरमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच जखमी झालेल्या ५ जणांवर नागपूरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
जीवितहानी नाही
या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने सोंडो गावाजवळील अपघातस्थळी धाव घेतली. सोंडो गावाजवळचा हा रस्ता महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा मुख्य मार्ग आहे. पुलाखाली वाहन कोसळल्याने प्रवाशांना बाहेर निघण्यास वाव मिळाला नाही, ज्यामुळे जीवितहानी झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे कागजनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
