
मुंबईत सध्या मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी जरांगे पाटलांची मागणी आहे. मात्र ओबीसी समाजाचा या मागणीला विरोध आहे. आज छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी छगन भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. भुजबळांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
छगन भुजबळ यांनी आज ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, मराठा आणि कुणबी एकच हे मानणं सामाजिक मूर्खपणा. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांसाठी EWS आरक्षण दिलेलं आहे. मराठा समाज मागास नाही, सुप्रीम कोर्टाचे हे विधान आहे. तसेच सरकारने मराठा समाजाला आणखी 10 टक्के आरक्षण दिले आहे. मराठा समाजातील लोकांना शेती, मग ते सर्व कुणबी का? असा सवालही भुजबळांनी उपस्थित केला आहे.
छगन भुजबळांनी म्हटलं की, आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची आरक्षणाबाबतची जजमेंट्स दाखवली. त्यांना सांगितलं की आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात जाऊ. संविधानातून निर्माण झालेली ही कागदपत्रे आहेत. ही सर्वांना मान्य करावी लागतील. ते लोक काय करणार याबाबत आम्हाला काहीही कर्तव्य नाही. आपण आता तयारीला लागा, अनेक ठिकाणी उपोषणे सुरु करायची आहेत. तहसीलदारापासून कलेक्टरपर्यंत सगळीकडे मोर्चे काढा. त्यांना आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत ही मागणी करा असा आदेश भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा आणि आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या विरोधात आता विदर्भात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. चंद्रपुरात ओबीसी संघटनांनी आज एक मोठी बैठक घेत जरांगेंच्या प्रयत्नांना जोरदार विरोध करण्याचे ठरविले आहे. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात उद्या 2 सप्टेंबर रोजी निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच 13 सप्टेंबर रोजी शहरात ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.