मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट; सायबर पोलिसांनी मोठा डाव उधळला
मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीचा मोठा डाव उधळला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सोशल मीडिया अकाउंटधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचे वैयक्तिक फोटो डिजिटल पद्धतीने मॉर्फ केले. आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर लिहून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचा प्रकार समोर आलाय.
हर्षल खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला एक्सप्लोरिंग नावाचे एक अकाऊंट दिसून आले. या खात्यावरून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
पोस्टमध्ये आक्षेपार्ह मजकूर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन सिडको येथील रहिवासी हर्षल श्रीधर खैरनार यांनी नाशिक शहर सायबर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली. खैरनार हे नेहमीप्रमाणे इन्स्टाग्रामचा वापर करत होते. त्यावेळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो बदलून पोस्ट केल्याचे निदर्शनास आले. या फोटोच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर लिहून छगन भुजबळ यांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
सायबर पोलिसांनी आरोपीचा मोठा डाव उधळला
एका पोस्टमध्ये छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे एकत्रित फोटो मॉर्फ करण्यात आले आहेत. अज्ञात आरोपीने 20 नोव्हेंबरआधी इन्स्टाग्रामआधी बोगस खाते तयार केले. त्यानंतर दोघांचे फोटो मोर्फ करून बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडून कारवाईसाठी हालचाली सुरू झाली आहे. पोलीस आरोपीकडे पोहोचण्याआधीच त्याने इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले. त्याने अकाऊंट डिलीट केले तरी, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितापर्यंत पोहोचण्यासाठी सायबर पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे अज्ञात आरोपीचा पलायनाचा डाव देखील उधळला आहे.