छगन भुजबळ नाराज? भाजपकडून रेड सिग्नल, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ! पुतणे समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदाची अट भाजपने फेटाळल्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज; राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याची सूत्रांची माहिती.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ हे सध्या कमालीचे नाराज असून त्यांनी दिल्लीत राज्यसभेवर जाण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळ यांनी घातलेली अट दिल्ली भाजप श्रेष्ठींनी फेटाळून लावल्यामुळे हे नाराजी नाट्य रंगल्याचे बोलले जात आहे.
नेमके काय घडले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कोअर कमिटीच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. या जागेसाठी छगन भुजबळ हे स्वतः उत्सुक होते. त्यांची राज्यसभेवर जाण्याची पसंती होती. मात्र, छगन भुजबळ यांनी पक्षासमोर आणि भाजप श्रेष्ठींसमोर एक मोठी अट ठेवली होती. जर ते स्वतः दिल्लीत गेले, तर त्यांच्या जागी रिक्त होणाऱ्या राज्यातील मंत्रिपदावर पुतणे समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी, अशी त्यांची मागणी होती.
दिल्लीतून रेड सिग्नल आणि राजेंद्र जैन यांना उमेदवारी
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांच्या या अटीला भाजप नेतृत्वाने स्पष्टपणे रेड सिग्नल दाखवला. समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याची अट अमान्य करण्यात आली. ही अट फेटाळली गेल्यामुळे छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी दिल्लीत जाण्यास म्हणजेच राज्यसभेची उमेदवारी घेण्यास नकार दिला. या नाट्यमय घडामोडींनंतर रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा एक महत्त्वाची बैठक पार पडली. भुजबळांच्या नकारानंतर पक्षाने अखेर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली.
भुजबळ महायुतीवर उलटणार?
एकीकडे समीर भुजबळांना मंत्रिपद नाही आणि दुसरीकडे स्वतःलाही राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार नसल्याने छगन भुजबळांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीतही नाशिकच्या जागेवरून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले होते. आता पुन्हा एकदा राज्यसभेच्या वेळी त्यांची मागणी अमान्य झाली आहे. त्यामुळे आगामी काळात छगन भुजबळ काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.