जिल्हा बँकेचा नवा बॉस कोण? दिग्गजांचे पत्ते कट, 10 वर्षांचा नियम नक्की काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उद्या २७ एप्रिलला मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, १० वर्षांच्या नियमामुळे अनेक दिग्गज नेत्यांना निवडणूक लढवता येणार नाही.

राज्यातील विविध निवडणुका पार पडल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सोमवारी (२७ एप्रिल) बँकेच्या मतदारांची प्रारूप यादी हरकती आणि आक्षेपांसाठी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, यंदा सहकार विभागाच्या एका नवीन नियमामुळे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रस्थापितांना १० वर्षांच्या नियमाचा फटका
यंदाच्या निवडणुकीत दहा वर्षांच्या कार्यकाळ सर्वात मोठी अडचण ठरणार आहे. नवीन नियमानुसार, ज्या संचालकांनी बँकेवर सलग १० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांना यावेळेस निवडणूक लढवता येणार नाही. या नियमाच्या कचाट्यात जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते अडकले आहेत.
कोणाकोणाला फटका?
यात प्रामुख्याने आमदार अब्दुल सत्तार, खासदार संदीपान भुमरे, विद्यमान उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी अध्यक्ष नितीन पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावांचा समावेश आहे. या नियमामुळे हे दिग्गज नेते आता स्वतः रिंगणात उतरु शकणार नाहीत. परिणामी, आपली सत्ता अबाधित राखण्यासाठी हे नेते आपल्या घरातील वारसांना किंवा विश्वासू कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुकीचे गणित कसे?
निवडणूक प्रक्रियेसाठी विविध स्तरांतून ठराव गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, विविध कार्यकारी सोसायट्यांकडून सर्वाधिक ६८९ ठराव आले आहेत. याशिवाय नॉन ॲग्री संस्थाचे ३५२ ठराव, प्रक्रिया संस्थांचे ९० ठराव आणि वैयक्तिक गटाकडून ८० ठराव आले आहेत.
आता उद्या २७ एप्रिल रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यावर हरकती घेण्यासाठी मतदारांना १० दिवसांचा कालावधी दिला जाईल. या हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम मतदार यादी जाहीर होईल. तिथून पुढील ४० ते ५० दिवसांत प्रत्यक्ष मतदान होऊन जिल्ह्याला नवीन संचालक मंडळ मिळणार आहे. मात्र १० वर्षांच्या नियमामुळे अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या चेहऱ्यांना बाजूला व्हावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. यावेळेस जिल्हा बँकेत नवे नेतृत्व उदयास येणार की जुन्याच नेत्यांचे वारसदार वर्चस्व गाजवणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.