
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई आई-वडिलांच्या आठवणीने भावूक झाले. त्यांनी केलेला संघर्ष सांगितला. वडिलांचे स्वप्न आणि आपली इच्छा सांगताना त्यांचे डोळे भरुन आले. कंठ दाटला. त्यावेळी सभागृहातील वातावरणही भावूक झाले होते. मला आर्किटेक्ट बनायचे होते. परंतु वडिलांचे वेगळेच स्वप्न होते. माझ्या वडिलांचे वकील होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे मला ते नेहमी वकील होण्याचा सल्ला देत होते, असे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपुरात बोलताना सांगितले.
सरन्यायाधीश भूषण गवई आई-वडिलांच्या आठवणी सांगताना म्हणाले, माझ्या वडिलांना वकील होण्याची इच्छा होती. पण चळवळीत तुरुंगवासात असल्याने ते होऊ शकले नाही. वडिलांनी त्या घटनेचा अतिशय सुंदर अभ्यास होता. मला वकील होण्यास वडिलांनी आग्रह केला. मुंबई उच्च न्यायालयात माझे नाव आले. पण प्रतीक्षा कालावधी जास्त होता. त्यावेळी वडील म्हणाले, वकीली केलीस तर फक्त पैसे कामावशील. पण जज झाला तर बाबासाहेबांचे विचार अनुसरून लोकांची सेवा करू शकशील. ते म्हणायचे की, तू सरन्यायाधीश होशील, असे सांगताना सरन्यायाधीश भावूक झाले.
सरन्यायाधीश भूषण गवाई भावूक झाल्यावर सभागृहातील वातावरणही गंभीर झाले. त्यांच्या ते लक्षात आले. त्यामुळे सभागृहातील वातावरण हलके करण्यासाठी त्यांनी हेमा मालिनी यांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, हेमा मालिनी यांच्यावर नागपूरच्या एका व्यावसायिकाने चेक बाऊन्सचा खटला दाखल केला होता. त्या खटल्यात मला आणि निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांना हेमा मालिनीकडून वकीलपत्र मिळाले होते. त्यावेळी हेमा मालिनी यांना पाहायला लोकांची आणि वकिलांची गर्दी झाली होती. त्या खटल्यामध्ये सरकारचा विषय नसताना जुगलकिशोर गिल्डा देखील आले होते. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्यांचेही नाव आले होते.
2008 मध्ये मी न्यायाधीश झालो असताना बबनराव पाचपुते पालकमंत्री असताना आले होते. त्याचवेळी शरद पवार साहेबांचा कार्यक्रम होता. यामुळे पाचपुते संभ्रमात होते. त्यावेळी शरद पवार पाचपुते यांना म्हणाले होते की, तू गवई यांच्या कार्यक्रमात जा. कारण एक दिवस ते देशाचे मुख्य न्यायाधीश होतील, शरद पवार यांचे ते भाकीत खरे ठरल्याची आठवणही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितली.
सरन्यायाधीश कुटुंबाबद्दल बोलताना म्हणाले, न्यायालयीन काम हे सतीचे वाण आहे. रामधनुष्य पेलण्यासारखे काम आहे. त्यात साहजिकच कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. माझी पत्नी आणि मुलांनी ते सांभाळून घेतले. 24 नोव्हेंबर नंतर मला भरपूर वेळ राहणार आहे.