Uddhav Thackeray | ‘रोजीरोटी बंद करायची नाही! पण…’ वाढत्या रुग्णसंख्येवर मुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

| Updated on: Jan 08, 2022 | 9:03 PM

मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, नर्स ,वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळं आजारी पडलेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे, असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळं समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या.

Uddhav Thackeray | रोजीरोटी बंद करायची नाही! पण... वाढत्या रुग्णसंख्येवर मुख्यमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. राज्यात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकांना नियमांचं काटेकोरपणे पानल करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्याचसोबत जे लोक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी, असेही निर्देश त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. राज्यात वाढत्या कोरोनामुळे नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्याला महत्त्वाचं आवाहन केलंय.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

“कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, लॉकडाऊनच्या चर्चा जोरात सुरु असताना त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आपल्या आवाहनात महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की,….

आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही. पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करत नियमांचं पालन करावं.

नाहीतर कारवाई अटळ!

काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळं आणि बेजबाबदार वागण्यामुळं प्रश्न निर्माण होतो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. यापुढे असं चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना, आणि पोलिसांना दिले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

रुग्णवाढ वाढली तर…

दरम्यान, आता हळूहळू आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे. असाच रुग्णवाढीचा वेग राहिला तर कोमॉर्बिड असलेल्यांना किंवा लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. इतकंच काय तर ऑक्सिजनची मागणीही पुन्हा वाढू शकते.

मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, नर्स ,वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळं आजारी पडलेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे, असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळं समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या. सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या.

शिक्षणात खंड नाही!

आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळं आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असं समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो, असंही मुख्यमंत्री म्हणालेत. तसंच लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे राज्य सरकारनं जारी केलेले नवे नियम?

  1. महाराष्ट्रात सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत संचारबंदी
  2. 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येता येणार नाही
  3. महाराष्ट्रात रात्री 11 ते प. 5 वा. पर्यंत नाईट कर्फ्यू
  4. शाळा आणि कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
  5. सार्वजनिक वाहतुकीत दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी
  6. 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना मुभा राहिल
  7. लग्न समारंभासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी
  8. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी
  9. खासगी कार्यालयांमध्ये 50 % उपस्थितीची परवानगी
  10. दोन्ही डोस घेतलेल्यांनाच कार्यालयांमध्ये येण्याची मुभा
  11. स्वीमिंग पूल, जीम, स्पा, ब्युटी पार्लर बंद
  12. सलूनमध्ये 50 % उपस्थितीत रात्री 10 पर्यंत परवानगी
  13. मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद
  14. शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स 50 % क्षमतेनं सुरु
  15. थिएटर, नाट्यगृह 50 %क्षमतेनं सुरु
  16. तारखा जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार

इतर बातम्या –

Maharashtra Corona Guidelines | महाराष्ट्रात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध -tv9

Special Report | ’10 दिवसात ठाकरे सरकारचा कोव्हिड घोटाळा बाहेर काढणार’-tv9

Maharashtra Corona Guidelines : महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी! राज्य सरकारची नवी नियमावली, जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashrta Corona | तब्बल 41 हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची राज्यात भर, 13 मृ्त्यू, बरे किती झाले?