‘चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ज्योतिरादित्य शिंदेंशी चर्चा

| Updated on: Oct 07, 2021 | 6:49 PM

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यासच नव्हे तर कोकणाला मोठा फायदा होईल, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराष्ट्र भेटीचं निमंत्रण दिलं आहे.

चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ज्योतिरादित्य शिंदेंशी चर्चा
उद्धव ठाकरे, ज्योतिरादित्य शिंदे
Follow us on

मुंबई : राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी चिपी विमानतळ सुरू झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यासच नव्हे तर कोकणाला मोठा फायदा होईल, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराष्ट्र भेटीचं निमंत्रण दिलं आहे. (CM Uddhav Thackeray and Jyotiraditya Scindia Meeting on Chipi Airport)

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विशेषतः नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद येथील विमानतळांवर अधिक क्षमतेने हवाई वाहतूक सेवा सुरू व्हावी. जेणेकरून पर्यटक व नियमित प्रवाशांची संख्या वाढेल व या भागांना त्याचा फायदा होईल. यादृष्टीने चर्चा केली तसेच काही तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्याची विनंती केली. सिंधुदूर्गातील चिपी विमानतळ सुरू होत आहे, त्याचा निश्चितच जिल्ह्याला व राज्याला फायदा होईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

हवाई वाहतूकीसाठी येणाऱ्या अडचणींवर चर्चा

या बैठकीत नागपूर, जळगाव, अकोला, सोलापूर, गोंदिया, जुहू, अमरावती येथील हवाई वाहतूक आणि दळणवळण  वाढविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात राज्य शासन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी अधिक समन्वय वाढविणे, तसेच कालबध्द रीतीने काम करावे यावरही चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच उपस्थित होते.

चिपी विमानतळ सुरु करण्यास DGCA ची परवानगी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळाल्यानंतर आता हे विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे. त्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी 20 सप्टेंबर रोजी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना वाद पाहायला मिळाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळात सुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं.

इतर बातम्या :

अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्याबाबत संपूर्ण माहिती द्यावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

मंदिरं उघडताच औरंगाबादेत भाजपचा आनंदोत्सव, केंद्रीय मंत्री कराड यांच्या उपस्थितीत गजानन महाराज मंदिरात आरती

CM Uddhav Thackeray and Jyotiraditya Scindia’s Meeting on Chipi Airport