मंगल देशा पवित्र देशा…भूषण गवईंचं भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सरन्यायाधीश यांचा भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भूषण गवई यांनी भारतीय संविधानावर भाष्य केले.

मंगल देशा पवित्र देशा...भूषण गवईंचं भाषण संपताच टाळ्यांचा कडकडाट; नेमकं काय घडलं?
bhushan gavai
| Updated on: Jul 08, 2025 | 4:52 PM

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत. त्यानिमित्ताने आज (8 जुलै) महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय राज्यघटना या विषयावर त्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सदस्यांपुढे प्रबोधनपर भाषण केले. दरम्यान, यावेळी गवई यांनी भारतीय राज्यघटनेविषयी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी मतं मांडली. तसेच विधीमंडळाने केलेला सत्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणानंतर दोन्ही सभागृहांच्या सदस्यांनी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी उभे राहून पुढची कित्येक मिनिटे सरन्यायाधीश यांचा टाळ्या वाजून सन्मान केला.

संविधान, संविधानाची निर्मिती, आंबेडकर यांच्या योगदानावर भाष्य

सरन्यायाधी भूषण गवई यांच्या सत्कारासाठी विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. तर मंचावर विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी नेते उपस्थित होते. भूषण गवई यांनी विधिमंडळाने केलेला सत्कार स्वीकारत हा सत्कार माझ्यासाठी फार लाखमोलाचा आणि अमूल्य आहे, असे मत व्यक्त केले. तसेच पुढे बोलताना भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये तसेच मसुदा समिती यावर भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाविषयीचे विचारही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्त्व असलेली व्यक्ती होते, असे मतही यावेळी गवई यांनी मांडले.  

गवईच्या सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट

तसेच आपल्या भाषणात शेवटी बोलताना, आज आपण सर्वांनी माझा जो बहुमान केला तो 12 कोटी लोकांनी दिलेला आशीर्वाद आहे, असे मी समजतो. मी या भूमीला, महाराष्ट्रातील सर्व जनतेला आपल्याद्वारे वंदन करतो, अशा भावना गवई यांनी व्यक्त केल्या. तसेच मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रमाण माझा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा असे म्हणत त्यांनी महाराष्ट्राला अभिवादन केले. त्यांच्या भाषणाच्या या अनोख्या शेवटामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानपरिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, सर्व आमदारांनी आपापल्या आसनावरून उठून सरन्याधीशांप्रती सन्मान व्यक्त केला. पुढच्या काही मिनिटांपर्यंत टाळ्यांचा कडकडाट करत सर्वांनीच सरन्यायाधीश यांचे कौतुक केले. सरन्यायाधीशांनीही हात जोडून सर्वांचे आभार मानले.