राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडावा, संसदेत चर्चा करावी; CM देवेंद्र फडणवीसांचं ओपन चॅलेंज
devendra fadnavis news : नीट पेपरफुटीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु विरोधक अराजकता निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

दिल्लीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. नीट पेपरफुटीरवरून काँग्रेस आणि विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संसदेतही या मुद्यावरून विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये गदारोळ पाहायला मिळत आहे. परंतु नीट पेपरफुटीवरून राहुल गांधी आणि विरोधकांनी संसदेत चर्चा करावी, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी CM फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘राहुल गांधी यांनी पळपुटेपाणा सोडवा. त्यानंतर संसदेत चर्चा करावी. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर होत नाहीत, तर संसदेत होतात. देशाच्या संविधानावर विश्वास असेल, तर संसदेत चर्चा करावी. उत्तर पाहिजे असतील, तर संसदेत मागा. तुमच्याकडे संकल्पना असेल, तर सरकारला करण्यासाठी मजबूर करा. आंदोलनाच्या भरवशावर राजकीय पोळी भाजणे बंद करावे. विद्यार्थी हिताच्या प्रश्नाबाबत निर्णय घ्यायचे असतील, तर ते चर्चेच्या माध्यमातून होतील’.
‘मोदींजीनी विद्यार्थी हिताला सर्वातोपरी प्राधान्य दिलं आहे. पेपरफुटीतील आरोपींना शिक्षा करण्याचा निश्चय केला आहे. मला असं वाटतं, या संपूर्ण प्रकरणात मोदींजींनी कडक भूमिका घेतली आहे. नीटची परीक्षा कोणत्याही अडचणीविना झाली आहे. विद्यार्थी पास झाल्यावर आनंद साजरा करत आहेत. अशाच पुढील परीक्षा झाल्या पाहिजे,यासाठी ही चर्चा आवश्यक आहे. यूपीए सरकारच्या काळात आठ हजार कोटी रुपयांचं बजेट होतं. ते आता 1 लाख 39 हजार कोटी रुपयांचं बजेट केलं आहे. सगळ्या आयकॉनिक संस्स्थेच्या सीट वाढवल्या आहेत. यात नवीन संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. याबाबत विरोधकांना चर्चा करायची नाही. कर्नाटक, तेलंगणामध्ये पेपर फुटले. पंजाबमध्ये पेपर फुटला. यासाठी अनुक्रमे काँग्रेस आणि ‘आप’ला उत्तर द्यावे लागेल. त्यांच्या प्रत्येक पेपरमध्ये घोटाळा झालाय. त्यांचे घोटाळे बाहेर येईल, त्यामुळे त्यांना संसदेत चर्चा करायची नाही. अराजकतेसाठी सर्व सुरु आहे. राज्यातील टीईटी घोटोळा ठाकरे सरकारच्या काळात झाला. त्यांच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले. पेपरफुटी इतकेच नव्हे, तर नापास लोकांना पास करण्याचा प्रयत्न केले, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला.